ट्रेनमध्ये कारण नसताना लाल चेन ओढली तर नेमकं काय होतं?
रेल्वेच्या डब्यात दिसणारी लाल रंगाची अलार्म चेन ही केवळ आपत्कालीन प्रसंगी वापरण्यासाठी असते. ट्रेनमध्ये काही अडचण निर्माण झाली किंवा एखाद्या प्रवाशाच्या जीवाला धोका निर्माण झाला, तर ही चेन महत्त्वाची ठरू शकते. मात्र गंमत म्हणून, ट्रेन थांबवण्यासाठी किंवा वैयक्तिक कारणासाठी चेन ओढल्यास प्रवाशाला कायदेशीर कारवाईला सामोरं जावं लागू शकतं. त्यामुळे ही चेन नेमकी कधी ओढता येते आणि ती ओढल्यानंतर ट्रेनमध्ये काय घडतं, हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे.
चेन ओढताच ट्रेन थांबते कशी?
अलार्म चेन ओढल्यानंतर ट्रेनच्या ब्रेक पाईपमधील हवेचा दाब कमी होतो. ही प्रक्रिया लोको पायलटला ब्रेकिंग सिस्टिममध्ये बदल झाल्याचं सूचित करते. परिस्थितीनुसार ट्रेन थांबवली जाते आणि त्यानंतर संबंधित डब्यात नेमकं काय घडलं, याची तपासणी केली जाते.
चेन ओढल्यानंतर काय होतं?
ट्रेन थांबल्यानंतर रेल्वे कर्मचारी किंवा सुरक्षा कर्मचारी संबंधित डब्यात पोहोचतात. चेन का ओढण्यात आली, याची चौकशी केली जाते. कारण योग्य असल्यास प्रवाशाला मदत केली जाते; मात्र विनाकारण चेन ओढल्याचं आढळल्यास संबंधित प्रवाशावर कारवाई होऊ शकते.
केव्हा चैन ओढावी?
आपत्कालीन परिस्थितीत अलार्म चेनचा वापर केला जाऊ शकतो. उदाहरणार्थ,
ट्रेन सुरू झाल्यानंतर लहान मूल, वृद्ध व्यक्ती किंवा दिव्यांग प्रवासी प्लॅटफॉर्मवर राहिल्यास. प्रवाशाची अचानक गंभीर तब्येत बिघडल्यास, ट्रेनमध्ये आग किंवा गंभीर सुरक्षेचा धोका निर्माण झाल्यास किंवा चोरी, दरोडा किंवा इतर गंभीर आपत्कालीन घटना घडल्यास योग्य ठरू शकतं मात्र प्रत्येक छोट्या गैरसोयीसाठी चैन ओढणं योग्य नाही.
विनाकारण चेन ओढल्यास दंड
भारतीय रेल्वे कायद्यात विनाकारण अलार्म चेन ओढण्याबाबत तरतूद आहे. कलम 141 अंतर्गत दोषी आढळल्यास कारवाई होऊ शकते. प्रकरणाच्या स्वरूपानुसार शिक्षा किंवा दंड लागू होऊ शकतो. त्यामुळे केवळ गंमत, ट्रेन थांबवण्याची घाई किंवा वैयक्तिक कारणासाठी चेन ओढण्यापूर्वी नक्कीच विचार करा.
Comments are closed.