पुतीन आणि जिनपिंग यांच्यासाठी दिल्लीत अभेद्य सुरक्षा व्यवस्था.

चार-स्तरीय संरक्षण प्रोटोकॉल : कडेकोट बंदोबस्त तैनात

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

दिल्लीत होणाऱ्या ब्रिक्स शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर राजधानीचे एका अभेद्य किल्ल्यात रुपांतर झाले आहे. दिल्ली पोलीस आणि इतर सुरक्षा यंत्रणांनी विशेषत: रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या सुरक्षेसाठी एक विशेष योजना तयार केली आहे. पुतीन मौर्य हॉटेलमध्ये वास्तव्यास असल्याने हॉटेल आणि त्याच्या आजूबाजूच्या परिसरातील सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली आहे.

पुतीन यांच्या संरक्षणासाठी चार-स्तरीय सुरक्षा कवच तयार करण्यात आले आहे. सर्वात आतील सुरक्षा कवच ‘क्लोज प्रोटेक्शन टीम’चे आहे. ही टीम पुतीन यांना सर्वात जवळची सुरक्षा पुरवेल आणि त्यांच्या प्रत्येक हालचालीदरम्यान त्यांच्यासोबत राहील. दुसऱ्या टप्प्यात दिल्ली पोलिसांचे वरिष्ठ अधिकारी तैनात करण्यात आले आहेत. हे अधिकारी हॉटेलमधील सुरक्षा व्यवस्थेवर सतत लक्ष ठेवून आहेत. तिसऱ्या टप्प्यात दिल्ली पोलीस कमांडो आणि निमलष्करी दलाचे जवान असून बाह्य कवच स्थानिक पोलिसांच्या अखत्यारीत आहे. हॉटेलच्या बाहेर, आजूबाजूच्या रस्त्यांवर आणि संपूर्ण परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त सुसज्ज आहे. पुतीन यांच्यासोबत त्यांचे सुमारे 25 ते 30 कमांडो आणि सुरक्षा अधिकारीही आहेत. रशिया आणि चीनची विशेष सुरक्षा पथकेही दिल्लीत दाखल झाली आहेत. ही पथके आपापल्या हॉटेलमधील सुरक्षा व्यवस्थेसंदर्भात भारतीय यंत्रणांशी समन्वय साधत आहेत. ही परदेशी सुरक्षा पथके अत्याधुनिक शस्त्रs आणि सुरक्षा उपकरणांनी सुसज्ज आहेत. चिनी राष्ट्राध्यक्षांच्या सुरक्षेची जबाबदारी दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाकडे सोपवण्यात आली आहे.

हॉटेल कर्मचाऱ्यांचीही पडताळणी

सुरक्षा यंत्रणा केवळ हॉटेलच्या बाहेर काम करणाऱ्यांचीच नव्हे, तर आत काम करणाऱ्यांचीही तपासणी करत आहेत. संबंधित हॉटेलमधील कर्मचाऱ्यांची पडताळणी करण्यात आली आहे. दिल्लीतील तसेच त्यांच्या मूळ राज्यांमधील त्यांच्या नोंदी तपासण्यात आल्या आहेत.

ताफा, मार्गांवरही बारकाईने लक्ष

दिल्ली वाहतूक पोलिसांनी विमानतळापासून हॉटेलपर्यंत आणि हॉटेलपासून भारत मंडपमपर्यंतचे मार्ग निश्चित केले आहेत. या मार्गांवरील सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी अनेकवेळा सराव करण्यात आला आहे. विमानतळापासून हॉटेलपर्यंत आणि हॉटेलपासून भारत मंडपमपर्यंतचा संपूर्ण मार्ग हाय अलर्टवर ठेवण्यात आला आहे.

Comments are closed.