‘आणखी एक मोदक घेऊ का?’ थांबा! दिवसातून किती मोदक खाणं सुरक्षित, जाणून घ्या
गणपती बाप्पा घरी आले की नैवेद्याच्या ताटात मोदक हवाच! उकडीचे गरमागरम मोदक दिसले की आणखी एक घेऊ का? हा प्रश्न पडतोच. पण उत्सवाच्या दिवसांत एकाच दिवशी अनेक ठिकाणी प्रसाद आणि मिठाई खाल्ली जाते. त्यामुळे आवडीचा मोदक खाताना प्रमाण किती असावे, हे जाणून घेणेही तितकेच महत्वाचे आहे.
मोदक किती कॅलरी देतो?
मध्यम आकाराच्या एका उकडीच्या मोदकात साधारण 150 ते 200 कॅलरी असू शकतात. मोदकाचा आकार, त्यातील गूळ, नारळ आणि तुपाचे प्रमाण यानुसार कॅलरी बदलू शकतात तर तळलेल्या मोदकात कॅलरीचे प्रमाण आणखी वाढू शकते. म्हणजेच 5 मोदक खाल्ले तर साधारण मोदकांमधून 750 ते 1,000 कॅलरी मिळू शकतात.
मोदकांचा अतिरेक नको
मोदकातील गूळ नैसर्गिक असला तरी त्यामध्ये साखर आणि कर्बोदके असतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणात मोदक खाल्ल्यास रक्तातील साखरेवर परिणाम होऊ शकतो. तसेच जास्त गोड आणि जड पदार्थांमुळे पोट फुगणे, अॅसिडिटी, जडपणा किंवा आळस जाणवू शकतो. वारंवार जास्त कॅलरी घेतल्यास वजन वाढण्याची शक्यताही असते.
दिवसाला किती खावे?
सर्वांसाठी एकच ठराविक सुरक्षित संख्या नसते. मात्र, निरोगी व्यक्तीसाठी 1 ते 2 मध्यम आकाराचे उकडीचे मोदक खाणे सुरक्षित ठरू शकते. त्याच दिवशी इतर मिठाई, गोड पेये आणि तळलेले पदार्थ जास्त प्रमाणात घेणे टाळा.
यांनी घ्या काळजी
मधुमेह किंवा प्री-डायबेटीस असल्यास मोदकाचे प्रमाण व्यक्तीनुसार बदलू शकते. त्यामुळे आपल्या आहार आणि औषधांनुसार डॉक्टर किंवा आहारतज्ज्ञांचा सल्ला घेणे योग्य ठरेल.
Comments are closed.