इथिओपिया आणि मलेशियासोबत भारताची भागीदारी

इथिओपियाने उघडले भारतीय खाण कंपन्यांसाठी दरवाजे : सेमीकंडक्टरवर मलेशियासोबत चर्चा

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

ब्रिक्स शिखर परिषदेपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इथिओपियाचे पंतप्रधान अबी अहमद अली आणि त्यांचे मलेशियन समकक्ष अन्वर इब्राहिम यांच्यासोबत स्वतंत्र बैठका घेतल्या. नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे शनिवारी होणाऱ्या ब्रिक्स शिखर परिषदेच्या उद्घाटनपर बैठकीपूर्वी झालेल्या या द्विपक्षीय बैठकांमध्ये विविध क्षेत्रांतील सामरिक भागीदारी अधिक मजबूत करण्याच्या मार्गांवर चर्चा झाली.

पंतप्रधान मोदींच्या इथिओपिया आणि मलेशियासोबतच्या द्विपक्षीय बैठकांनी या देशांसोबतच्या भारताच्या संबंधांना एक नवी दिशा दिली आहे. दोन्ही देशांनी भारतासोबत अधिक मजबूत संरक्षण सहकार्याची इच्छा व्यक्त केली. संयुक्त कर्मचारी प्रशिक्षण आणि भारताकडून संरक्षण उपकरणांच्या खरेदीवर चर्चा झाली. दोन्ही देशांनी भारतीय उद्योग आणि गुंतवणुकीचे स्वागत केले. इथिओपियाने विशेषत: भारतासोबत सुकर धोरण अवलंबताना भारतीय खाण कंपन्यांसाठी आपला देश खुला करण्याची आपली वचनबद्धता व्यक्त केली. तर मलेशियासोबत सेमीकंडक्टर क्षेत्रातील संधींवरही चर्चा झाली.

परराष्ट्र मंत्रालयाने एक निवेदन जारी करून दोन्ही देशांसोबत झालेल्या चर्चेविषयीची घोषणा केली. दोन्ही देशांनी भारतासोबत संरक्षण सहकार्य अधिक मजबूत करण्यात तीव्र स्वारस्य व्यक्त केले आहे. परराष्ट्र मंत्रालयाच्या एका सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, या बैठकांमध्ये आर्थिक सहकार्य, संरक्षण आणि सुरक्षा भागीदारी, आणि क्षमता बांधणी यासह अनेक महत्त्वाच्या मुद्यांवर चर्चा झाली. याप्रसंगी प्रमुख क्षेत्रांमधील प्रगतीचा आढावा घेण्यात आला. इथिओपिया आणि मलेशिया संरक्षण, गुंतवणूक आणि सेमीकंडक्टर या क्षेत्रांत भारतासोबत मोठे करार करण्याच्या दिशेने वाटचाल करत असल्याचे संकेत मिळत आहेत.

भारताची इथिओपियासोबत बैठक

18 व्या ब्रिक्स शिखर परिषद 2026 च्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्लीतील हैदराबाद हाऊस येथे इथिओपियाचे पंतप्रधान अबी अहमद अली यांच्यासोबत द्विपक्षीय बैठक घेतली. अली यांच्यासोबत झालेल्या चर्चेत पंतप्रधान मोदींनी परस्पर हिताच्या प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींवर चर्चा केली. इथिओपियाने भारतासोबत अधिक मजबूत संरक्षण सहकार्यासाठी उत्सुकता व्यक्त केली. इथिओपियाने भारतीय उद्योग आणि गुंतवणुकीचे स्वागत केले. भारतीय सरकारी सूत्रांनुसार, इथिओपियाने विशेषत: भारतीय खाण कंपन्यांच्या दृष्टीने सकारात्मक निर्णय घेतल्याने द्विपक्षीय संबंधांना नवे बळ मिळणार आहे.

मलेशियासोबतच्या बैठकीत सहकार्य प्रगतीचा आढावा

मलेशियाचे पंतप्रधान अन्वर इब्राहिम आणि नरेंद्र मोदी यांच्यात झालेल्या बैठकीनंतर जारी केलेल्या निवेदनानुसार, दोघांनी फेब्रुवारी 2026 मध्ये पंतप्रधान मोदींच्या मलेशिया दौऱ्याच्या परिणामांवर चर्चा केली आणि व्यापार व गुंतवणूक, संरक्षण व सुरक्षा, सेमीकंडक्टर, पायाभूत सुविधा, डिजिटल अर्थव्यवस्था, ऊर्जा, फिनटेक, शिक्षण, पर्यटन आणि जन-जन संबंध यासह अनेक क्षेत्रांमधील द्विपक्षीय सहकार्याच्या प्रगतीचा आढावा घेतला.

कोटा किनाबालूमध्ये भारताचे नवीन वाणिज्य दूतावास उघडणार

भारत-मलेशिया द्विपक्षीय बैठकीदरम्यान, पंतप्रधान अन्वर इब्राहिम यांनी सबाहमधील कोटा किनाबालू येथे मलेशियातर्फे भारतीय वाणिज्य दूतावास उघडण्यास सहमती दर्शवली. हा निर्णय दोन्ही देशांमधील संबंध अधिक दृढ करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल मानला जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आसियान-भारत भागीदारी मजबूत करण्यासाठी मलेशियाच्या सातत्यपूर्ण पाठिंब्याचे कौतुक केले. दोन्ही नेत्यांनी प्रादेशिक आणि जागतिक मुद्यांवर विचारविनिमय केला आणि भारत-मलेशिया व्यापक सामरिक भागीदारी अधिक दृढ करण्याच्या आपल्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला.

 

Comments are closed.