अफगाणिस्तानला धडा, शिकवण्यासाठी टीम इंडिया सज्ज; दिल्लीच्या रणांगणात आज पहिला टी-20 सामना
अफगाणिस्तानविरुद्धच्या टी-20 क्रिकेट मालिकेतील पहिल्या सामन्यासाठी हिंदुस्थानी संघ सज्ज झाला असून, दिल्लीच्या मैदानावर उभय संघांमध्ये चुरशीची लढत रंगणार आहे. मात्र, सामना सुरू होण्याआधीच कर्णधार श्रेयस अय्यरसमोर संघ निवडीचे मोठे पेच उभे राहिले आहेत. संजू सॅमसन, वैभव सूर्यवंशी आणि अभिषेक शर्मा या तिघांपैकी सलामीला कोणत्या दोन फलंदाजांना संधी द्यायची, ही त्याच्यासाठी सर्वात मोठी डोकेदुखी असेल.
जसप्रीत बुमरा आणि वरुण चक्रवर्ती यांच्या पुनरागमनामुळे हिंदुस्थानी संघ जवळपास पूर्ण ताकदीने मैदानात उतरणार आहे. हार्दिक पंडय़ा आणि हर्षित राणा दुखापतीमुळे उपलब्ध नसतील. दुसरीकडे, अफगाणिस्तानचा संघही टीम इंडियाला धक्का देण्याच्या इराद्याने दिल्लीच्या मैदानात उतरणार आहे. दुखापतीमुळे टी-20 विश्वचषकाला मुकलेला वेगवान गोलंदाज नवीन-उल-हक संघात परतला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये हिंदुस्थानवर पहिला विजय मिळवण्याची संधी साधण्याचा त्यांचा निर्धार असेल.
राशीदच्या फिरकीचा कस; श्रेयसच्या नेतृत्वाची परीक्षा
अफगाणिस्तानचा माजी कर्णधार आणि धोकादायक फिरकीपटू राशीद खानच्या कामगिरीवरही सर्वांचे लक्ष असेल. आयपीएलमधील मागील दोन हंगामांतील अपयशानंतर त्याने यंदा पुन्हा लय पकडली आहे. दिल्लीतील आयपीएल सामन्यात त्याने 17 धावांत तीन बळी घेत आपल्या फिरकीची ताकद दाखवली होती. आता हिंदुस्थानी फलंदाजांना रोखण्याचे मोठे आव्हान त्याच्यासमोर असेल. टीम इंडियाच्या बाजूने मात्र श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाची खरी परीक्षा असेल. त्याच्या नेतृत्वाखाली हिंदुस्थानला तीन वर्षांनंतर पहिली मालिका गमवावी लागली आहे. त्यामुळे कर्णधार म्हणून मैदानात उतरताना स्वतःच्या
बॅटनेही दम दाखवण्याचे आव्हान त्याच्यासमोर आहे.
संघनिवडीचा पेच
संजू सॅमसन, वैभव सूर्यवंशी आणि अभिषेक शर्मा यांच्यातील निवड श्रेयस अय्यरसाठी डोकेदुखी ठरणार आहे. टी-20 विश्वचषकातील सर्वोत्तम खेळाडू ठरलेला सॅमसन, झिम्बाब्वेविरुद्ध मालिकावीर ठरलेला युवा वैभव आणि आक्रमक फलंदाजीसाठी ओळखला जाणारा अभिषेक हे तिघेही तगडे दावेदार आहेत. याशिवाय नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल आणि शिवम दुबे या अष्टपैलूंच्या निवडीचाही पेच आहे. हर्षित राणाच्या अनुपस्थितीत आठव्या क्रमांकासाठी विशेष गोलंदाज की फलंदाजीला बळ देणारा अष्टपैलू, हा प्रश्नही हिंदुस्थानी संघ व्यवस्थापनासमोर आहे.
Comments are closed.