2029 पूर्वी एनडीए सरकार असलेल्या सर्व 21 राज्यांत समान नागरी कायदा लागू करण्याचा प्रयत्न : अमित शाह – TMarathiNews
मुंबई : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी रविवारी मुंबईत बोलताना देशातील सुरक्षा, समान नागरी कायदा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सार्वजनिक जीवनातील 25 वर्षांच्या सेवेशी संबंधित विविध मुद्द्यांवर भाष्य केले. 2029 पूर्वी भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकार असलेल्या सर्व 21 राज्यांत समान नागरी कायदा (UCC) लागू करण्याचा प्रयत्न केला जाईल, असा दावा शाह यांनी केला.
काही राज्यांमध्ये UCC आधीच लागू करण्यात आल्याचे शाह यांनी सांगितले. देशातील सर्व नागरिकांसाठी समान नागरी कायद्याची अंमलबजावणी करण्याच्या दिशेने सरकार पुढे जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
दहशतवादाविरोधात ‘झिरो टॉलरन्स’ची भूमिका
दहशतवादी हल्ल्यांना भारताने दिलेल्या प्रत्युत्तरामुळे जगासमोर देशाची ताकद स्पष्ट झाली असल्याचे शाह म्हणाले. सर्जिकल स्ट्राइक, एअर स्ट्राइक आणि ऑपरेशन सिंदूर यांसारख्या कारवायांमुळे दहशतवादाविरोधात भारताने ‘झिरो टॉलरन्स’ची भूमिका प्रस्थापित केल्याचा दावा त्यांनी केला.
याशिवाय अनुच्छेद 370 हटवणे, नक्षलवादावर नियंत्रण मिळवणे आणि ईशान्य भारतातील दीर्घकाळ प्रलंबित समस्यांवर तोडगा काढणे, या माध्यमातून देशाला तीन मोठ्या संकटांतून दिलासा मिळाल्याचेही शाह यांनी नमूद केले.
17 सप्टेंबरपासून देशव्यापी ‘सेवा संकल्प अभियान’
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सार्वजनिक जीवनातील 25 वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर भाजप, मित्रपक्ष, संपूर्ण एनडीए परिवार, स्वयंसेवी संस्था आणि जनतेच्या सहभागातून 17 सप्टेंबर ते 17 ऑक्टोबर 2026 या कालावधीत देशव्यापी ‘सेवा संकल्प अभियान’ राबविण्यात येणार असल्याची घोषणा अमित शाह यांनी केली.
17 सप्टेंबर हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्मदिवस असून, 7 ऑक्टोबर 2026 रोजी मुख्यमंत्री आणि पंतप्रधान म्हणून त्यांच्या सार्वजनिक जीवनातील सलग 25 वर्षांचा कालावधी पूर्ण होत असल्याचे शाह यांनी सांगितले.
जिल्ह्यापासून बूथ स्तरापर्यंत कार्यक्रम
हे अभियान देशातील प्रत्येक राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात राबविले जाणार आहे. जिल्हा, लोकसभा मतदारसंघ, विधानसभा मतदारसंघ तसेच बूथ स्तरापर्यंत पोहोचून जनतेशी संवाद साधण्यात येणार असल्याचे शाह यांनी सांगितले.
‘प्रधान सेवक’ म्हणून नरेंद्र मोदी यांनी आपले सार्वजनिक जीवन जनसेवेला समर्पित केले असल्याचेही त्यांनी नमूद केले. गरीब कल्याण, अर्थव्यवस्था मजबूत करणे, राष्ट्रीय सुरक्षा आणि दीर्घकाळ प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी सरकारने संवैधानिक अधिकारांचा वापर केल्याचा दावा शाह यांनी केला.
विविध उपक्रमांचे आयोजन
‘सेवा संकल्प अभियान’अंतर्गत देशभर विविध कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत. यामध्ये सेवा दिवस, ‘मेरे सपनों का भारत’ चित्रकला, ‘नमो सेवा की अनकही कहानियां’, स्थानिक भाषांमधील संगीतमय नाट्यप्रयोग, आंगण मिलन सेवा, सेवा ज्योती कलश यात्रा, वडनगर ते वाराणसी सेवा यात्रा, सेवा मेरा योगदान, सेवा सेतू अभियान, सेवा के रंग राष्ट्र के संग, सेवा फॉर इनोव्हेशन चॅलेंज आणि सुशासन सेवा संवाद यांसारख्या उपक्रमांचा समावेश असेल.
Comments are closed.