बॅनर्जी पोटनिवडणूक लढवणार नाहीत.
पश्चिम बंगाल विधानसभेसाठी कार्यक्रम घोषित
► वृत्तसंस्था/ कोलकाता
पश्चिम बंगाल या राज्यात विधानसभेच्या दोन जागांसाठी पोटनिवडणूक होणार आहे. मात्र, राज्याच्या माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी या पोटनिवडणुकांमध्ये आपण उमेदवार असणार नाही, अशी घोषणा केली आहे. तृणमूल काँग्रेसने या दोन्ही पोटनिवडणुकांसाठी पक्षाच्या उमेदवारांची घोषणा केली आहे. या दोन पोटनिवडणुकांपैकी एका जागेवर त्या उमेदवार असतील, अशी शक्यता प्रारंभी व्यक्त केली जात होती. तथापि, ती शक्यता आता पूर्णत: संपलेली दिसून येते.
या वर्षी एप्रिल-मे मध्ये झालेल्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेस पक्षाचा दारुण पराभव झाला होता. त्यामुळे सलग पंधरा वर्षे या राज्यात असलेली त्यांची सत्ता गेली होती. स्वत: ममता बॅनर्जीही त्यांच्या पारंपरिक भवानीपूर विधानसभा मतदार संघातून पराभूत झाल्या होत्या. त्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने मोठा विजय मिळविताना विधानसभेतील 294 जागांपैकी 207 जागांवर यश संपादन केले होते. नंतर फालता या मतदारसंघातही प्रचंड यश मिळवून आपल्या जागांची संख्या 208 वर नेली होती. मात्र, भारतीय जनता पक्षाचे नेते आणि विद्यमान मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी यांनी दोन जागांवर निवडणूक लढवून दोन्ही स्थानी यश प्राप्त केले होते. नंतर त्यांनी नंदीग्राम मतदारसंघाची जागा सोडली होती. या जागेवर आता पोटनिवडणूक होत आहे.
आणखी एक पोटनिवडणूक
पश्चिम बंगालमध्ये स्थानिक पक्षाचे एक उमेदवार हुमायून कबीर हेही दोन मतदारसंघांमधून विजयी झाले होते. त्यानंतर त्यांनी रेजीनगर मतदारसंघ सोडला होता. त्यामुळे या स्थानीही पोटनिवडणूक घेण्यात येत आहे. अशा प्रकारे राज्यात विधानसभेच्या दोन पोटनिवडणुका होत आहेत. नंदीग्राम हा हिंदुबहुल मतदारसंघ असून रेजीनगर हा मुस्लीमबहुल मतदारसंघ आहे. या दोन्ही जागांवर भारतीय जनता पक्ष आणि तृणमूल काँग्रेस हे पक्ष त्यांचे उमेदवार देत आहेत. डावे पक्ष आणि काँग्रेसही या पोटनिवडणुकात उतरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
नंदीग्राम मतदारसंघ प्रतिष्ठेचा
गेल्या दोन विधानसभा निवडणुकांपासून नंदीग्राम मतदारसंघ भारतीय जनता पक्ष आणि तृणमूल काँग्रेस यांच्यात प्रतिष्ठेचा बनलेला आहे. याच मतदारसंघात 17 वर्षांपूर्वी ममता बॅनर्जी यांनी उग्र आंदोलन केल्याने या राज्यातील डाव्यांची सलग 34 वर्षांची सत्ता संपुष्टात आली होती. 2011 मध्ये डाव्यांना धूळ चारत ममता बॅनर्जी आणि त्यांचा तृणमूल काँग्रेस पक्ष सत्तेवर आला होता. त्यामुळे ही जागा या पक्षासाठी प्रतिष्ठेची आहे. मात्र, 2021 मध्ये विद्यमान मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी यांनी ममता बॅनर्जी यांना याच मतदारसंघातून हरविले होते. त्या निवडणुकीत तृणमूल काँग्रेसला प्रचंड बहुमताने सत्ता मिळाली होती. पण ममता बॅनर्जी पराभूत झाल्या होत्या. 2026 च्या विधानसभा निवडणुकीतही भारतीय जनता पक्षाने येथे विजय मिळविल्याने ही जागा त्याच्यासाठी अत्यंत महत्वाची आणि प्रतिष्ठेची आहे.
चार राज्यांमध्ये होणार पोटनिवडणुका
पश्चिम बंगालसह अन्य तीन राज्यांमध्येही विधानसभेच्या जागांसाठी लवकरच पोटनिवडणुका होणार आहेत. तामिळनाडू राज्यात मदुरांतकम आणि धारापुरम या दोन विधानसभा जागांसाठी पोटनिवडणूक होत आहे. मरागथम कुमारवेल आणि पी. सत्यभामा यांनी या जागा सोडल्याने त्या होत आहेत. पुद्दूचेरी या केंद्रशासित प्रदेशात थट्टानचावडी मतदारसंघात एन. रंगास्वामी यांनी ही जागा सोडल्याने पोडनिवडणूक होत आहे. तर आसाममध्ये नागांव या लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होणार आहे. या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे काँग्रेस खासदार प्रद्युम्न बोरदोलोई हे आता भारतीय जनता पक्षाचे आमदार झाल्याने तेथे पोटनिवडणूक घेतली जाणार आहे. अशा प्रकारे एकंदर 6 पोटनिवडणुका होतील.
चार राज्यांमध्ये सहा पोटनिवडणुका
ड लवकरच चार राज्यांमध्ये 5 विधानसभा आणि 1 लोकसभा पोटनिवडणूक
ड पश्चिम बंगालमध्ये नंदीग्राम मतदारसंघ भाजप आणि तृणमूलसाठी प्रतिष्ठेचा
ड आसाममधील नागांव लोकसभा मतदारसंघातही भाजप-काँग्रेस चुरस होणार
Comments are closed.