पाथिरागेने फेकला 91 मीटर भाला!
श्रीलंकेचा स्टार भालाफेकपटू रुमेश पाथिरागे याने आपल्या भाल्याने थेट सुवर्णावर निशाणा साधला. वर्ल्ड अॅथलेटिक्स अल्टिमेट चॅम्पियनशिपमध्ये पाथिरागेने तब्बल ९१.०९ मीटरची भालाफेक करत सुवर्णपदकावर नाव कोरले. या दमदार कामगिरीसमोर ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता पाकिस्तानचा अरशद नदीम मात्र पिछाडीवर पडला. नदीमने ८१.४९ मीटरची मोसमातील सर्वोत्तम फेक करत पाचवे स्थान मिळवले. ग्रेनाडाचा अँडरसन पीटर्स ८६.१८ मीटर फेकीसह रौप्यपदकाचा मानकरी ठरला, तर जर्मनीच्या ज्युलियन वेबरने ८५.८९ मीटर भाला फेकत कांस्यपदक पटकावले.
१२ पैकी ११ स्पर्धा जिंकल्या
२०२६चा मोसम पाथिरागेसाठी जबरदस्त ठरला आहे. आतापर्यंत झालेल्या १२ स्पर्धांपैकी तब्बल ११ स्पर्धांमध्ये त्याने विजय मिळवला आहे. रोममध्ये त्याने ९२.६२ मीटरची भालाफेक केली होती, तर झ्युरिखमध्ये ९२.०७ मीटरची फेक करत विजेतेपद पटकावले होते. अल्टिमेट चॅम्पियनशिपमधील ९१.०९ मीटरची फेक ही त्याची यंदाच्या मोसमातील ९० मीटरपेक्षा अधिक अंतराची तिसरी फेक ठरली.
Comments are closed.