AFGvsIND: “पहिल्या टी20 मधून वैभवला ड्रॉप केल्यानंतर माझी बायको ओरडलीच…”, वाचा सविस्तर कोणी केले हे वक्तव्य

भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात तीन सामन्याची टी20 मालिका दिल्ली येथे खेळली जात आहे. या मालिकेतील पहिला सामना रविवारी (13 सप्टेंबर) खेळला गेला, ज्यामध्ये भारताच्या अंतिम अकरामध्ये युवा स्फोटक फलंदाज वैभव सूर्यवंशीला स्थान मिळाले नाही. त्याच्याऐवजी संजू सॅमसनला संघात घेतल्याने मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि कर्णधार श्रेयस अय्यर यांच्यावर टीकाही झाली. भारताच्या एका माजी खेळाडूने तर वैभव खेळणार नसल्याचा त्याच्या पत्नीला धक्काच बसला असे सांगितले आहे.

अफगाणिस्तानविरुद्धचा पहिला सामना भारताने जिंकला, मात्र संघ व्यवस्थापनाच्या चुकलेल्या निर्णयाबाबत अधिक चर्चा झाली. झाले असे की, या सामन्यात वैभवला वगळून संजूला संघात घेतले गेले. मागील मालिकेत वैभव मालिकावीर ठरला होता आणि त्याला सामन्यात घेतले नाही, यावरून भारताचे माजी क्रिकेटपटू के श्रीकांत यांनी व्यवस्थापनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. यावेळी त्यांनी त्यांच्या पत्नीसोबत केलेल्या संवादाबाबतही सांगितले आहे.

पहिल्या सामन्यात सूर्यवंशी खेळला नाही म्हणून आम्ही चित्रपट बघायला लागलो. तो खेळला नाही म्हणून माझी पत्नी ओरडू लागली आणि मागच्या सामन्यातील सामनावीर खेळत नाहीये, असे वाद घालू लागली. माझी पत्नी त्याला संघातून वगळण्यावरही प्रश्न विचारत होती. तुम्ही वैभवला नीट वागणूक देत नाही आहात. आता, जर तो पुढचा सामना खेळला, तर धावा न केल्यास आपल्याला संघातून वगळले जाईल की काय, असा तो विचार करेल, असे श्रीकांत यांनी त्यांच्या युट्यूब चॅनेलवर म्हटले आहे.

श्रीकांत यांच्या मते, भारतीय संघ व्यवस्थापनाने वैभवला सातत्याने पाठिंबा दिला पाहिजे. त्यासाठी त्यांनी वैभवच्या देशांतर्गत आणि आयपीएल कामगिरीचा दाखला दिला. तसेच त्यांनी संजूला ज्याप्रकारे वागणूक दिली जात आहे, यावर खेदही व्यक्त केला.

हे संघ व्यवस्थापन संजूला खेळवत आहे. मला त्याची कीव येते. एकतर त्याला अधिक संधी द्या आणि मग संघातून वगळा, किंवा वैभवला न वगळता अनेक सामने खेळू द्या. या दोन्ही खेळाडूंना अधूनमधून दोन-दोन सामने खेळायला मिळत आहे, हे त्याच्यांसाठी योग्य नाही. भारत ही चूक करत आहे, असेही श्रीकांत यांनी पुढे म्हटले आहे.

अफगाणिस्तानविरुद्धचा पहिला सामना भारताने 7 विकेट्सने जिंकला. यामध्ये संजू केवळ 10 धावा करत बाद झाला होता. (India Dropped Vaibhav Sooryavanshi vs AFG 1st T20I, even my wife questioned me says former cricketer)

Comments are closed.