गणेशोत्सवात अचानक आलेल्या पाहुण्यांसाठी झटपट मेन्यू

गणेशोत्सवाच्या काळात घरोघरी बाप्पाच्या दर्शनासाठी नातेवाईक, मित्रपरिवार आणि शेजाऱ्यांची ये-जा सुरू असते. अशा वेळी अचानक अनेक पाहुणे एकत्र आल्यास जेवणात काय बनवायचे? असा मोठा प्रश्न गृहिणींसमोर उभा राहतो. ऐनवेळी धावपळ न होता कमी वेळेत, सोप्या पद्धतीने आणि चविष्ट बेत कसा आखावा, यासाठी काही सोप्या टिप्स जाणून घेऊयात.

तूप-भात आणि गरमागरम वरण

मूग किंवा तुरीच्या डाळीचे जिरे-कढीपत्त्याची फोडणी दिलेले वरण, वाफाळलेला भात आणि त्यावर साजूक तूप हा सर्वात आवडीचा पर्याय ठरेल.

पुरी-भाजी आणि कोशिंबीर

गव्हाच्या पिठाच्या पुऱ्या पटकन होतात. त्यासोबत उकडलेल्या बटाट्याची सुकी भाजी किंवा रस्सा भाजी कमी वेळेत तयार होते. सोबत काकडीची कोशिंबीर किंवा ताक दिल्यास बेत पूर्ण होईल.

मसालेभात किंवा पुलाव

भाज्या आणि खडा मसाला वापरून कुकरमध्ये झटपट मसालेभात बनवता येतो. यासोबत रायता किंवा पापड-कुडड्या तळल्यास पाहुणेही खूश होतात.

गोड पदार्थ

मोदक नसतील तर काळजीचे कारण नाही. रवा किंवा शेवयांची खीर अवघ्या 10 ते 15 मिनिटांत तयार होते.

अचानक पाहुणे आल्यास घरात उपलब्ध असलेल्या कढधान्यांचा वापर करून कोणतीही उसळ किंवा आमटी तुम्ही बनवू शकता. याशिवाय पूर्वतयारी म्हणून थोडे जास्त पीठ मळून ठेवणे आणि बटाटे उकडून ठेवणे अशा छोट्या गोष्टी गृहिणींची ऐनवेळची धावपळ वाचवू शकतात.

हेही वाचा – Ganpati Special 2026 : बाप्पाच्या आवडीच्या गोड खिरीची कथा

Comments are closed.