Ratnagiri News – दापोलीत हळव्या नाचणी वाणाचे पीक फुलले
दापोलीत हळव्या नाचणी वाणाचे पीक उत्तम प्रकारे फुलले असून, यावर्षी गणपतीतच नाचणी पसवण्यास चांगली सुरुवात झाली आहे. नाचणी हे एक अत्यंत पौष्टिक आणि कमी पाण्यात येणारे खरीप हंगामातील महत्त्वाचे भरड धान्य आहे. लागवडीसाठी हलकी ते मध्यम, पाण्याचा उत्तम निचरा होणारी आणि ५.५ ते ८.५ सामू (pH) असणारी जमीन योग्य असते. मान्सूनवर आधारित, उष्ण व दमट हवामान या पिकासाठी उत्तम मानले जात असून, डोंगर उतारावर किंवा वरकस जमिनीतही हे पीक डौलदारपणे वाढते. जून ते जुलै दरम्यान या पिकाची पेरणी किंवा रोपांची लागवड केली जाते आणि प्रामुख्याने महाराष्ट्रात कोकण आणि पश्चिम घाटात याची मोठ्या प्रमाणावर शेती केली जाते.
नाचणीमध्ये कॅल्शियम, लोह (आयर्न) आणि प्रथिने भरपूर प्रमाणात असल्यामुळे हे आरोग्यासाठी अत्यंत औषधी तृणधान्य आहे. यातील भरपूर कॅल्शियममुळे हाडे आणि दात बळकट होतात, तर लोह हे रक्तातील लाल पेशी वाढवून अशक्तपणा कमी करण्यास मदत करते. याचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असल्याने आणि तंतुमय घटक उत्तम प्रमाणात असल्यामुळे मधुमेह, हृदयरोग व बद्धकोष्ठतेच्या रुग्णांसाठी हे वरदान ठरते. यापासून भाकरी, आंबील, नाचणी सत्त्व, पापड असे विविध पौष्टिक पदार्थ बनवले जातात. कमी पाण्यात आणि खडकाळ जमिनीतही तग धरत असल्यामुळे हे पीक हवामान बदलाच्या काळात शेतकऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरत आहे.
Comments are closed.