नंदीग्रामसाठी भाजपचा उमेदवार जाहीर.
मुख्यमंत्र्यांच्या मृत स्वीय सचिवाची माता उमेदवार
वृत्तसंस्था/ कोलकाता
पश्चिम बंगाल राज्य विधानसभेच्या दोन मतदारसंघांमधील पोटनिवडणुकांसाठी भारतीय जनता पक्षाने उमेदवारांची घोषणा केली आहे. त्यांच्यापैकी नंदीग्राम या प्रतिष्ठेच्या मतदारसंघात या पक्षाने राज्याचे मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी यांच्या हत्या झालेल्या स्वीय सचिवाच्या मातेला उमेदवारी दिली आहे. त्यांचे नाव हसीरानी रथ असे आहे. मुख्यमंत्र्यांचे स्वीय सचिव चंद्रनाथ रथ यांची हत्या करण्यात आली होती. हसीरानी रथ यांनी मंगळवारी त्यांचा उमेदवारी अर्ज सादर केला आहे.
चंद्रनाथ रथ हे मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी यांचे अनेक वर्षांपासूनचे स्वीय सचिव होते. 6 मे 2026 च्या मध्यरात्री त्यांची उत्तर 24 परगाणा जिल्ह्यातील मध्यमनगर येथे गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणाची चौकशी अद्याप केली जात आहे. आता त्यांच्या आई हसीरानी यांनी उमेदवारी देण्यात आली आहे, अशी माहिती भारतीय जनता पक्षाकडून मंगळवारी देण्यात आली.
6 ऑक्टोबरला मतदान
पश्चिम बंगालसह चार राज्यांमध्ये विधानसभा पोट निवडणुकांसाठी तसेच आसाममधील एका लोकसभा पोटनिवडणुकीसाठी 6 ऑक्टोबरला मतदान होणार आहे. या पोटनिवडणुकांचा कार्यक्रम केंद्रीय निवडणूक आयोगाकडून घोषित करण्यात आला आहे. पश्चिम बंगालमधील रेजीनगर या अन्य मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाने साखारव सरकार यांना उमेदवारी दिली आहे. ते बुधवारी आपला उमेदवारी अर्ज सादर करणार आहेत, अशी महिती देण्यात आली आहे.
20 हजार कार्यकर्त्यांची उपस्थिती
हसीरानी रथ यांनी नंदीग्राम येथे जानकीनाथ मंदिरात पूजाआर्चा करुन, नंतर मिरवणुकीने हल्दिया येथील जिल्हाधिकाऱ्यांसमोर आपला उमेदवारी अर्ज सादर केला आहे. या मिरवणुकीत 20 हजारांहून अधिक कार्यकर्त्यांचा समावेश होता. मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारही देखील अन्य नेत्यांसह मिरवणुकीत सहभागी झाले.
पोटनिवडणूक कशासाठी…
एप्रिल-मे 2026 मध्ये पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणूक घेण्यात आली. या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने घवघवीत यश संपादन केले. त्यापूर्वी 15 वर्षै सलग सत्तेवर राहिलेल्या तृणमूल काँग्रेस या पक्षाचा दारुण पराभव होऊन राज्यात सत्तापालट झाला. भारतीय जनता पक्षाच्या राज्य शाखेचे नेते शुभेंदू अधिकारी यांनी भवानीपूर मतदारसंघात माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना पराभूत केले. अधिकारी यांनी नंदीग्राममधूनही विजय मिळविला. नंतर त्यांनी नंदीग्राम मतदारसंघ सोडला. त्यामुळे या मतदारसंघात ही पोटनिवडणूक होत आहे.
Comments are closed.