रोनाल्डोच्या संघाने 87 वर्षांचा विक्रम मोडला
फुटबॉलच्या मैदानावर ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या अल नासर संघाने इतिहासाला धक्का दिला आहे. सौदी प्रो लीगमध्ये अल खलीजविरुद्ध 1-1 अशी बरोबरी झाली असली तरी अल नासरने सलग 94 सामन्यांत किमान एक गोल करण्याचा विश्वविक्रम रचत तब्बल 87 वर्षे जुना अर्जेंटिनाच्या रिव्हर प्लेटचा विक्रम मोडून काढला.
रिव्हर प्लेटने 1936 ते 1939 या काळात सलग 93 सामन्यांत गोल करण्याचा विक्रम नोंदविला होता. अल नासरने या ऐतिहासिक विक्रमावर अखेर मात केली. डिसेंबर 2023 मध्ये अल हिलालविरुद्ध 0-3 असा पराभव झाल्यानंतरच्या सामन्यापासून अल नासरच्या गोलधडाक्याला सुरुवात झाली. त्यानंतर प्रत्येक सामन्यात गोल करत संघाने विक्रमाची मालिका सुरूच ठेवली. अल खलीजविरुद्धच्या सामन्यात 72व्या मिनिटाला अब्दुल्ला अल-हमदानने केलेल्या गोलने अल नासरच्या विक्रमावर शिक्कामोर्तब केले. सामना जिंकता आला नाही; पण एका गोलने क्लब फुटबॉलच्या इतिहासात अल नासरचे नाव कायमचे कोरले.
Comments are closed.