मनोज जरांगे-पाटील मुक्कामासाठी 2 वाजता पाटोद्यात पोहोचले; अडीच वाजता झाली सभा, पहाटेपर्यंत हजारो मराठा बांधव जागेच

आंतरवलीहून निघालेले मनोज जरांगे-पाटील पहिल्या मुक्कामासाठी पाटोद्यात मध्यरात्री दोन वाजता दाखल झाले. मध्यरात्रीही सोबत तेवढाच समाज, तेवढीच गर्दी, तेवढ्याच गाड्या; व्यासपीठावर अडीच वाजता पोहोचल्यानंतर जरांगे-पाटील यांनी सभा घेतली. सरकारने मला गोळ्या घालायचे षडयंत्र रचले आहे. मला आता एकट्याला जाऊ द्या, सोबत येऊ नका; मला मरायचेच आहे तर मुंबईत मरू द्या, रस्त्यात नको, असे आवाहन त्यांनी समाजाला केले. बीड, मांजरसुंबा, लिंबागणेश येथेही प्रचंड गर्दी आणि प्रचंड जनसमुदाय उपस्थित होता.

नोंदी सापडल्या, हैदराबाद गॅझेटचे काय, असा सवाल करत सरकारच्या विरोधात एल्गार पुकारलेले मनोज जरांगे-पाटील आंदोलनासाठी अंतरवली सराटीहून मुंबईकडे निघाले. बीडमध्ये येण्यासाठी जरांगे-पाटील यांना तब्बल सात तासांचा कालावधी लागला. रात्री अकरा वाजता मांजरसुंब्यामध्ये पोहोचले. प्रचंड गर्दी, वाहनांच्या लांबच लांब रांगा, मराठा बांधवांचा प्रचंड जनसमुदाय, ठिकठिकाणी सत्कार, हार-तुरे यांतून मार्ग काढत मनोज जरांगे-पाटील यांना मुक्कामाच्या ठिकाणी म्हणजेच पाटोद्यात पोहोचायला रात्रीचे दोन वाजले. प्रकृती अस्वस्थ असतानाही जरांगे-पाटील यांनी मराठा बांधवांना उद्देशून भाषण केले. १८ दिवसांच्या उपोषणामुळे जरांगे-पाटील यांची प्रकृती खालावली आहे. त्यातच झोप नसल्याने पोटात आग पडली आहे. अशा बिकट परिस्थितीत मनोज जरांगे-पाटील हजारोंच्या जनसमुदायाला उद्देशून बोलत होते.

ते म्हणाले, “आपल्यासाठी कोणी नाही हे लक्षात ठेवा, मराठा समाज मोठा करायचा आहे. मराठ्यांनी लढायला शिकले पाहिजे, मी कधी घाबरलो नाही, खचलो नाही. माझा स्वाभिमान मी कधी विकू दिला नाही. मराठा समाजाच्या लेकरांबाळांसाठी लढताना माझे शरीर आता थकले आहे. या सरकारला वाटते मी शरण यावे आणि मागणी सोडून द्यावी; सरकारपेक्षा माझा बाप, माझा समाज मोठा आहे. माझा समाज कोणतेही सरकार पाडू शकतो आणि दुसरे सरकार आणू शकतो. आजचा प्रवास मोठा झाला, समाजाला मी सांगितले होते सोबत येऊ नका, मला एकट्याला जायचे आहे; पण ऐकले नाही. जर तुम्ही ऐकणार नसाल तर मी पोलिसांना सांगेन आणि दुसऱ्या रस्त्याने मुंबईला निघून जाईन, मी थकलो आहे. शरीरापेक्षा दौरा महत्त्वाचा नाही. तुम्ही ऐकत नसाल तर मला दौराच रद्द करावा लागेल,” असे म्हणत उद्या पाटोद्याहून एकही गाडी माझ्या मागे येऊ देऊ नका, असे त्यांनी म्हटले.

मी सलाईन घेतले की सरकार बिनधास्त होते, सलाईन सोडले की सरकारला टेन्शन येते

“मी सलाईन सुरू केले की, सरकार निर्धास्त राहते आणि सलाईन घ्यायचे सोडले की सरकारला टेन्शन येते. मराठा बांधवांच्या ५८ लाख नोंदी मिळाल्या आहेत म्हणजेच अडीच कोटी समाज आरक्षणात गेला आहे. आता गॅझेटसाठी प्रयत्न करतोय. या सगळ्या नोंदी पेनड्राइव्हमध्ये घेतल्या आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्या तोडीस तोड मी डाव टाकतोय. तीन वर्षे झाली मी त्यांना हरवतो आहे,” असेही जरांगे-पाटील यांनी म्हटले.

थरथरणारे हात आणि डोळ्यांत अश्रू; बापाने घेतली लेकाची भेट

अठरा दिवसांचे उपोषण, नाजूक झालेली प्रकृती, अशाही परिस्थितीत लेक मनोज जरांगे-पाटील मुंबईकडे निघाले आहेत. काळजीने ग्रासलेले मनोज जरांगे-पाटील यांचे वडील रावसाहेब जरांगे-पाटील लेकाच्या भेटीसाठी पहाटे तीन वाजता पाटोद्यात दाखल झाले. अवघ्या पाच मिनिटांच्या भेटीत बाप-लेकाचे भावुक नाते समोर आले. थरथरणारे हात लेकाच्या डोक्यावरून फिरत होते. चिंतेने वडिलांच्या डोळ्यांत अश्रू येत होते. डोळ्यांच्या कडा चिंब झालेले रावसाहेब पाटील ‘काळजी घे’ म्हणत माघारी निघाले.

Comments are closed.