आंघोळी न करताच Gen Z जातायत डेटवर; काय आहे ‘अनपॉलिश्ड लूक’ ट्रेंड
डेटवर जाण्याआधी छान कपडे, परफ्यूम आणि हेअरस्टाईलची तयारी करणं म्हणजे नेहमीची गोष्ट. पण आता डेटिंग ट्रेंडच्या दुनियेत याच्या अगदी उलट ट्रेंडची चर्चा सुरू आहे. काही Gen Z तरुण मंडळी डेटवर जाण्यापूर्वी आंघोळ करणं किंवा डिओड्रंट लावणंही टाळत असल्याचं सोशल मीडियावरील चर्चांमधून समोर येत आहे. यामागे ‘फेरोमोन मॅक्सिंग’ किंवा ‘अनपॉलिश्ड लूक’ अशी संकल्पना सध्या चर्चेत आहे.
अनपॉलिश्ड लूक म्हणजे ?
या ट्रेंडमध्ये व्यक्तीने स्वतःला खूप तयार करून, परफ्यूम किंवा डिओड्रंटचा सुगंध लावून डेटवर जाण्याऐवजी आपला नैसर्गिक वास आणि साधा लूक ठेवावा, असा विचार केला जातो. म्हणजेच डेटसाठी स्वतःला ‘परफेक्ट’ दाखवण्यापेक्षा नैसर्गिक राहण्यावर भर दिला जातो.
ट्रेंडमागचं कारण काय?
या ट्रेंडचे समर्थक शरीराच्या नैसर्गिक वासामुळे समोरच्या व्यक्तीशी आकर्षण किंवा ‘केमिस्ट्री’ निर्माण होऊ शकते, असा दावा करतात. त्यामुळे परफ्यूम न वापरता नैसर्गिक वास तसाच ठेवण्याची कल्पना पुढे आली आहे.
नैसर्गिक राहणे आणि वैयक्तिक स्वच्छता पूर्णपणे सोडणे या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. आंघोळ न केल्यामुळे घाम, बॅक्टेरिया आणि शरीराचा वास वाढू शकतो. त्यामुळे ट्रेंड व्हायरल झाला म्हणून प्रत्येकाने तो तसाच फॉलो करणे गरजेचे नाही. कारण शेवटी डेटवर काय घालायचं किंवा किती तयार व्हायचं हा प्रत्येकाचा वैयक्तिक निर्णय आहे; मात्र स्वतःला सहज आणि आत्मविश्वासाने ठेवताना स्वच्छतेकडे दुर्लक्ष न करणंही तितकंच महत्वाचं आहे.
Comments are closed.