Ratnagiri News – गव्याच्या सततच्या दर्शनाने आंबव पोंक्षेवासीय धास्तावले, शेतीचे नुकसान

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

संगमेश्वर तालुक्यातील आंबव पोंक्षे गावात गव्याच्या सततच्या दर्शनाने ग्रामस्थ धास्तावले आहेत. गव्यामुळे तालुक्यात सतत होणारे अपघात आणि नुकसान यामुळे आंबव पोंक्षे गावातील ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. आंबव पोंक्षे गावात गेले दोन तीन वर्षांपासून तुरळच्या सीमेकडे पकडेवाडी, भुवडवाडीच्या बाजूला गव्यांचे कळप येऊ लागले. गतवर्षापासून तर शेतामध्ये धुमाकूळ घालायला सुरवात केली. भातशेती, पावटा, कडवा, कुळीथ आदी पिकांची नासधूस केल्याने शेतात पिकच आले नाही.

गवा हा पूर्णपणे शाहाकारी असून पूर्णतः तृणभक्षी प्राणी असल्याने तो गवत, भातशेती व अन्य शेतातील पिकांकडे सहज आकर्षित होतो. या प्राण्यांचे वजन 800 ते 1500 किलोपर्यंत असू शकते. त्यामुळे त्याला आहार मोठा लागतो. परिणामी गवे शेतामध्ये उतरल्यावर शेतकऱ्यांच्या हाती काहीच राहत नाही. या अजस्त्र प्राण्यांकडून नव्याने लावलेली आंबा, काजूच्या झाडांची नासधूस होत आहे.

आता गव्यांचे कळप आंबव पोंक्षे-सरंद आणि आंबव पोंक्षे-आरवली ह्या मुख्य मार्गांवर अचानक दिसत असल्याने सर्वत्र घबराट पसरली आहे. शाळकरी मुले याच रस्त्यावरून पायी ये जा करत असतात. अशा वेळी दुर्घटना घडल्यास कोण जबाबदार असा सवाल ग्रामस्थ विचारत आहेत. वनविभागाला याबाबत सातत्याने सांगूनही अद्याप यावर काहीही केलेले नसल्याचे सरपंच शेखर उकार्डे यांनी सांगितले.

Comments are closed.