अवघ्या 17 दिवसांपूर्वी लग्न, कुटुंबीयांशी बोलून झोपला तो उठलाच नाही; हैदराबादच्या तरुणाचा अमेरिकेत संशयास्पद मृत्यू
हैदराबादच्या इंजिनिअर तरुणाचा अमेरिकेतील राहत्या संशयास्पद मृत्यू झाला आहे. मोहम्मद जाबेर हुसेन (28) असे मयत तरुणाचे नाव आहे. अवघ्या 17 दिवसांपूर्वी मोहम्मदचे लग्न झाले होते. हुसेन मॅसॅच्युसेट्समधील लोवेल येथे सिव्हिल इंजिनिअर म्हणून कार्यरत होता. कुटुंबीयांनी मुलाचा मृतदेह लवकरात लवकर मायदेशी आणण्यासाठी मदतीची याचना केली आहे.
एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, हुसेनचे लग्न 28 ऑगस्ट रोजी टेक्सासमध्ये झाले होते आणि त्यानंतर तो मॅसॅच्युसेट्सला परतला होता. त्याची पत्नी त्याच्यासोबत परतली होती की नाही, हे स्पष्ट झालेले नाही, असे हुसेनचे वडील मोहम्मद झाकीर हुसेन यांनी सांगितले. हुसेनचे 14 सप्टेंबर रोजी शेवटचे आपल्या कुटुंबीयांशी शेवटचे बोलणे झाले होते. त्यानंतर सुमारे आठ तासांनी, त्याच्या रूममेटचा फोन कुटुंबीयांना आला आणि त्याने हुसेनचा झोपेतच मृत्यू झाल्याची माहिती दिली.
या घटनेनंतर हुसेनला त्वरित वैद्यकीय मदत मिळाली होती की नाही, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. हुसेनचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच हुसेनच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल.
मुलाचा मृतदेह मायदेशी आणण्यासाठी कुटुंबीयांनी हिंदुस्थान सरकारकडे मदतीची विनंती केली आहे. हुसेनच्या वडिलांनी एक्स पोस्ट करत, संबंधित हिंदुस्थानी दूतावासाला अमेरिकेतील स्थानिक प्रशासनाशी समन्वय साधण्यास आणि मृतदेह आणण्यासाठी आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी मदत करण्यास सांगावे, अशी विनंती परराष्ट्र मंत्र्यांकडे केली आहे.
हुसेन 2021 मध्ये कनेक्टिकटमधील ‘युनिव्हर्सिटी ऑफ न्यू हेवन’मधून सिव्हिल इंजिनिअरिंगमधील पदव्युत्तर पदवी घेण्यासाठी अमेरिकेत गेला होता. 2023 मध्ये पदवी पूर्ण केल्यानंतर त्याने ‘एस्टिमेटर’ (Estimator) नावाच्या कंपनीत इंटर्न म्हणून काम सुरू केले. त्यानंतर, त्याने ‘ग्रीन इंटरनॅशनल ॲफिलिएट्स इंक’ (Green International Affiliates Inc) या कंपनीत काम करण्यास सुरुवात केली. येथे तीन वर्षांहून अधिक काळ काम केल्यानंतर त्याने या वर्षी जूनमध्ये पुन्हा नोकरी बदलली आणि ते मॅसॅच्युसेट्समधील ‘लोचनर’ (Lochner) नावाच्या कंपनीत रुजू झाला.
Comments are closed.