डेव्हिस कप टेनिस स्पर्धा; आजपासून हिंदुस्थानची ‘फायनल-८’ साठी कोरियाशी टक्कर

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

डेव्हिस कपच्या ‘फायनल ८’मध्ये धडक मारण्यासाठी हिंदुस्थान सज्ज झाला आहे. पात्रता फेरीच्या दुसऱ्या फेरीत हिंदुस्थानची दक्षिण कोरियाशी सोलच्या ऑलिम्पिक टेनिस सेंटरमध्ये शुक्रवारी आणि शनिवारी कडवी झुंज होणार आहे. या लढतीत बाजी मारणारा संघ इटलीतील बोलोनिया येथे होणाऱ्या डेव्हिस कपच्या अंतिम आठ संघांत स्थान मिळवेल. डेव्हिस कप क्रमवारीत हिंदुस्थान १९ व्या, तर दक्षिण कोरिया १६ व्या स्थानावर आहे. त्यामुळे सोलमधील सामना चुरशीचा होण्याची चिन्हे आहेत. विशेष म्हणजे, सध्याच्या स्वरूपात हिंदुस्थानला प्रथमच ‘फायनल-८’ मध्ये प्रवेश करण्याची संधी आहे.

दक्षिणेश्वर सुरेश करणार मोहिमेची सुरुवात
जागतिक क्रमवारीत ३६७व्या स्थानावर असलेला दक्षिणेश्वर सुरेश पहिल्या एकेरीत दक्षिण कोरियाच्या क्वॉन सून-वूशी भिडणार आहे. त्यानंतर हिंदुस्थानचा आघाडीचा एकेरीपटू सुमित नागल माजी ऑस्ट्रेलियन खुल्या स्पर्धेतील उपांत्य फेरीवीर चुंग ह्योन याच्याशी दोन हात करेल. नागल सध्या जागतिक क्रमवारीत २४७व्या स्थानावर आहे. क्वॉनने कारकिर्दीत ५२वे स्थान गाठले आहे. त्यामुळे सुरेशसमोर अनुभवी प्रतिस्पर्ध्याचे आव्हान असेल.

दुहेरीत बालाजी-पूनाचा यांची कसोटी
दुसऱ्या दिवसाची सुरुवात दुहेरीच्या सामन्याने होणार आहे. हिंदुस्थानकडून एन. श्रीराम बालाजी आणि निखिल कल्याण पूनाचा यांची जोडी दक्षिण कोरियाच्या नाम जी-सुंग आणि पार्क उई-सुंग यांच्याशी भिडेल. श्रीराम बालाजी जागतिक क्रमवारीत ४९व्या, तर पूनाचा ८८ व्या क्रमांकावर आहे.

पाच सामन्यांच्या या स्पर्धेत तीन विजय मिळविणारा संघ पुढे जाणार आहे. सामना निर्णायक टप्प्यावर पोहोचल्यास सुमित नागल आणि दक्षिणेश्वर सुरेश यांना उलट एकेरीत पुन्हा कोर्टवर उतरावे लागू शकते.

Comments are closed.