पंतप्रधान मोदींचा वाढदिवस साजरा
भाजपकडून देशभरात अनेक सेवाकार्यांचा प्रारंभ
‘सेवा संकल्प अभियाना’ला प्रतिसाद
- वाढदिवसाच्या निमित्ताने भाजपचा व्यापक जनसंपर्क कार्यक्रम, सेवाकार्ये
- भारतासह जगभरातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव
- इटलीच्या नेत्या मिलोनी यांचा पंतप्रधान मोदी यांना विशेष शुभेच्छा संदेश
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 76 वा वाढदिवस देशभरात विविध सेवाकार्यांचा प्रांभ करुन साजरा करण्यात आला आहे. हा वाढदिवस थाटामाटात न करता देशातील अनेक भागांमध्ये भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जनहिताच्या विविध कार्यांमध्ये भाग घेऊन साजरा केला. या अभियानाला ‘सेवासंकल्प अभियान’ असे संबोधले जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना या दिनानिमित्त त्यांच्या असंख्य समर्थकांनी आणि भारतीय जनता पक्षाचे नेते, कार्यकर्ते, पदाधिकारी, विविध मुख्यमंत्री यांना मन:पूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत. विदेशांमधील नेत्यांनीही या दिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन करुन त्यांना शुभेच्छा दिल्या.
भारतीय जनता पक्षाने या दिनानिमित्त हाती घेतलेली सेवाकार्ये एक महिनाभर चालणार आहेत. सेवाकार्यांच्या माध्यमातून जनता संपर्क केला जाणार असून गेल्या साधारण सव्वाबारा वर्षांमध्ये भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडी यांनी केलेल्या जनोपयोगी कामांची माहिती तळागाळातील जनतेपर्यंत नेली जाणार आहे. या अभियानाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाप्रमाणेच आणखी एक महत्वाची पार्श्वभूमी आहे. याच वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या अधिकारकाळाची सलग 25 वर्षे पूर्ण करीत आहेत. 2001 मध्ये त्यांची गुजरातच्या मुख्यमंत्रीपदी नियुक्ती करण्यात आली होती. तेव्हापासून ते सातत्याने राज्याच्या किंवा देशाच्या सर्वोच्च नेतेपदी विराजमान आहेत. हा भारतीय नेत्यांमधला एक विक्रमच आहे.
'आशीर्वाद दिवा'
गुरुवारी संध्याकाळी 6 वाजल्यापासून 7 वाजेपर्यंत भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समर्थकांनी आपल्या घरी दीपप्रज्वलन करुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रदीर्घ आयुरारोग्य लाभावे, अशी प्रार्थना करावी, असे आवाहन भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी केले होते. या आवाहनाला देशभरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समर्थकांनी आणि भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मोठा प्रतिसाद दिल्याचे दिसून आले आहे.
विविध सार्वजनिक उपयोगिता कार्यक्रम
या दिनानिमित्त देशभरात अनेक स्थानी रक्तदानाची शिबिरे आयोजित करण्यात आली. दिल्लीत भारतीय जनता पक्षाच्या मुख्यालयात रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. त्याला मोठा प्रतिसाद मिळाला. पक्षाकडून अनेक राज्यांमध्ये स्वच्छता अभियान, बालकांसाठी आणि युवकांसाठी चर्चा स्पर्धा, चित्रकला स्पर्धा आणि इतर प्रकारांचे रचनात्मक कार्यक्रम पक्षाकडून आयोजित करण्यात आले. चर्चा स्पर्धा ‘पचीस करोड बालकेंका भारत’ या मथळ्याने आयोजित केली गेली.
वृक्षारोपण कार्यक्रमाला प्रतिसाद
पर्यावरणाच्या संरक्षणासाठी वृक्षांची संख्या वाढविणे महत्वाचे असल्याने या दिनी देशभरात पक्षाने वृक्षारोपणाचे अनेक कार्यक्रम केले. त्यांना बालके आणि युवकांकडून मोठा प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले. त्याचप्रमाणे अनेक स्थानी आरोग्य परीक्षण शिबिरांचे आयोजन करण्यात आले. असंख्य नागरीकांचे आरोग्य परीक्षण या शिबिरांमध्ये करण्यात आले. या उपक्रमांमध्ये डॉक्टर्सही मोठ्या संख्येने सहभागी झाले. देशातील अनेक शहरांमध्ये पथनाट्योही सादर करण्यात आली.
वाराणसी, वडनगरमध्ये मोठे कार्यक्रम
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे जन्मगाव असणारे गुजरातमधील वडनगर आणि त्यांचा लोकसभा मतदारसंघ असणारे वाराणसी शहर येथे मोठ्या प्रमाणात सेवा कार्यक्रम हाती घेण्यात आले. आंध प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनीही वाराणसीमध्ये ‘सेवा संकल्प अभियाना’ सहभाग घेतला. राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील पक्षांचे नेते आणि कार्यकर्तेही या अभियानात सहभागी झाले. वडनगरमध्ये मोठ्या प्रमाणात सेवा आणि रचनात्मक कार्ये हाती घेण्यात आली.
Comments are closed.