Ratnagiri News – SIRच्या नावाखाली मतदारांची धावपळ; प्रशासनाच्या चुकीची शिक्षा मतदारांना का? संगमेश्वर तालुक्यातील नागरिकांना मनस्ताप

मतदार याद्या अद्ययावत करण्याच्या प्रक्रियेला अर्थात एसआयआरला वेग आला असताना प्रशासनाच्या पातळीवर झालेल्या कथित चुका दुरुस्त करण्याची जबाबदारीही आता मतदारांवरच ढकलली जात असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे. विशेष म्हणजे, वर्षानुवर्षे मतदार यादीत असलेली नावे, तसेच सर्व आवश्यक कागदपत्रे आणि पुरावे सादर करूनही नव्या यादीत नाव अथवा वडिलांच्या नावात चूक झाल्याने मतदारांची चांगलीच धावपळ सुरू झाली आहे.

संगमेश्वर तालुक्यातील एका कुटुंबातील चार सदस्यांची नावे गेल्या कित्येक वर्षांपासून मतदार यादीत आहेत. नुकत्याच झालेल्या सर्वेक्षणाच्या वेळी या कुटुंबाने आधारकार्ड, मतदान ओळखपत्र यासह आवश्यक कागदपत्रे आणि पुरावे सादर केले. मात्र, नवीन मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर चार सदस्यांपैकी एका मुलाच्या वडिलांच्या नावात चूक झाल्याचे निदर्शनास आले.

मतदार यादी तयार करण्याच्या प्रक्रियेत आधारकार्ड, मतदान ओळखपत्र आणि अन्य कागदपत्रांच्या आधारे माहिती घेण्यात आली असेल, तर त्या माहितीची नोंद करताना चूक नेमकी कुठे झाली, असा सवाल आता संबंधित मतदारांकडून उपस्थित केला जात आहे. चूक प्रशासनाच्या नोंदणी प्रक्रियेत झाली असेल, तर तिच्या दुरुस्तीची जबाबदारीही प्रशासनाने घ्यायला हवी. मात्र, उलट मतदारालाच पुन्हा कार्यालयाच्या पायऱ्या झिजवाव्या लागत असतील, तर ‘चूक कुणाची आणि शिक्षा कुणाला?’ असा प्रश्न उपस्थित होणे स्वाभाविक आहे.

मतदार हा केवळ निवडणुकीच्या वेळी मतदान करणारा नागरिक नसून, त्याच्या रोजच्या आयुष्यात रोजगार, व्यवसाय, शेती आणि कुटुंबाच्या जबाबदाऱ्या आहेत. अशा परिस्थितीत प्रशासनाच्या नोंदीतील दुरुस्तीसाठी त्याने वारंवार कार्यालयात येणे, फॉर्म भरणे आणि कागदपत्रे सादर करणे कितपत योग्य आहे, असा प्रश्न नागरिक विचारत आहेत. विशेषतः ग्रामीण भागातील अनेक मतदारांना तहसील कार्यालय किंवा संबंधित निवडणूक यंत्रणेकडे जाण्यासाठी वेळ आणि आर्थिक खर्च करावा लागतो. त्यामुळे प्रशासनाच्या चुकीची दुरुस्ती करण्यासाठी पुन्हा पुन्हा मतदारांनाच का फिरवले जात आहे? अशी नाराजी व्यक्त होत आहे.

निवडणूक आयोगाने एस आय आर प्रक्रियेत मतदारांच्या नोंदी दुरुस्ती आणि आवश्यक प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी ३० सप्टेंबर २०२६ ही अंतिम तारीख निश्चित केल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे संबंधित मतदारांनी त्यापूर्वी आवश्यक फॉर्म क्रमांक ८ भरून दुरुस्ती करून घेण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, संगमेश्वर तालुक्यातील काही एस आर आयशी संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता, तहसीलदार कार्यालयाकडून अद्याप या संदर्भात स्पष्ट मार्गदर्शन मिळाले नसल्याची माहिती त्यांनी दिल्याचे समोर आले आहे.यामुळे एकीकडे अंतिम मुदत जवळ येत असताना दुसरीकडे प्रत्यक्ष काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्येच मार्गदर्शनाबाबत संभ्रम असल्यास सामान्य मतदारांनी नेमके काय करायचे, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

मतदाराने वेळेत कागदपत्रे दिली, सर्वेक्षणावेळी सहकार्य केले आणि तरीही अंतिम यादीत त्याच्या नावात किंवा नातेसंबंधाच्या नोंदीत चूक राहिली, तर त्यासाठी जबाबदारी निश्चित कोणाची राहणार? चुकीच्या नोंदीमुळे एखाद्या पात्र नागरिकाचे नाव मतदानाच्या प्रक्रियेत अडचणीत आले अथवा त्याला मतदानाचा हक्क बजावता आला नाही, तर त्याची जबाबदारी कोण स्वीकारणार, असा थेट सवाल संगमेश्वर तालुक्यातील मतदारांकडून उपस्थित केला जात आहे.

एस आर आय प्रक्रिया ही मतदार याद्या अचूक आणि अद्ययावत करण्यासाठी असल्याने त्यामध्ये पारदर्शकता आणि स्पष्टता असणे आवश्यक आहे. प्रशासनाच्या नोंद प्रक्रियेत झालेल्या चुका असल्यास त्या दुरुस्त करण्यासाठी नागरिकांना अनावश्यक त्रास होणार नाही, अशी व्यवस्था करणे गरजेचे आहे. त्यामुळे संगमेश्वर तालुक्यात एस आर आय अंतर्गत मतदार याद्यांमध्ये झालेल्या चुका, फॉर्म क्रमांक ८ भरण्याची प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे, अंतिम मुदत आणि संबंधित अधिकाऱ्यांची जबाबदारी याबाबत तहसील प्रशासनाने स्पष्ट सूचना प्रसिद्ध कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.‘मतदार यादी शुद्ध करण्याच्या नावाखाली मतदारच अशुद्ध प्रक्रियेचा बळी ठरू नये,’ अशी अपेक्षा व्यक्त करत, प्रशासनाने तातडीने मार्गदर्शन करून नागरिकांची धावपळ थांबवावी, अशी मागणी होत आहे.

Comments are closed.