Ratnagiri News – पडिक पाण्याच्या टाकीत अडकलेल्या मगरीच्या पिल्लाची सुटका; अलोरे-नागावे येथे वन विभागाच्या पथकाची तत्पर कारवाई, नैसर्गिक अधिवासात केले मुक्त
चिपळूण तालुक्यातील अलोरे-नागावे येथील पालांडेवाडी येथे पाणी नसलेल्या पडिक पाण्याच्या टाकीत अडकलेल्या मगरीच्या पिल्लाची वन विभागाच्या बचाव पथकाने सुरक्षित सुटका केली. अंदाजे तीन फूट लांबीचे हे मगरीचे पिल्लू सुस्थितीत असून, प्राथमिक पाहणीनंतर त्याला नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात आले.
१७ सप्टेंबर रोजी सुविनंद पालांडे यांच्या घरासमोरील पाणी नसलेल्या पडिक टाकीत मगरीचे पिल्लू पडल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. ही टाकी सुमारे पाच ते सहा फूट खोल असल्याने मगरीच्या पिल्लाला बाहेर पडण्याचा मार्ग नव्हता. पालांडे यांनी तातडीने वन विभागाच्या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधून घटनेची माहिती दिली. त्यानंतर चिपळूण वनपरिक्षेत्र अधिकारी एस. एस. खान यांच्याशी संपर्क करण्यात आला.
माहिती मिळताच वन्यप्राणी बचाव पथकातील वनरक्षक राहुल गुंठे आणि पथकाचे सदस्य अजय बदाडे घटनास्थळी दाखल झाले. टाकीची पाहणी केल्यानंतर बचाव पथकाने मगरीच्या पिल्लाला सुरक्षितपणे बाहेर काढले. त्यानंतर त्याला सुरक्षितरीत्या जेरबंद करून प्राथमिक तपासणी करण्यात आली. मगरीचे पिल्लू सुस्थितीत असल्याची खात्री झाल्यानंतर वरिष्ठांच्या आदेशानुसार त्याला नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात आले.हे बचावकार्य विभागीय वन अधिकारी गिरिजा देसाई, सहाय्यक वनसंरक्षक प्रियंका लगड आणि वनपरिक्षेत्र अधिकारी एस. एस. खान यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. वनरक्षक राहुल गुंठे आणि बचाव पथकाचे सदस्य अजय बदाडे यांनी या बचावकार्यात सहभाग घेतला.
Comments are closed.