तारखेची वाट न बघता तत्काळ दुष्काळ जाहीर करा- आमदार कैलास पाटील

मराठवाड्यात दुष्काळाची परिस्थिती भयानक झाली असून, शेतकरी, शेतमजूर त्रस्त झाला आहे. अशा परिस्थितीत तारखेची वाट न बघता मराठवाड्यात तत्काळ दुष्काळ जाहीर करा, अशी मागणी शिवसेनेचे आमदार कैलास पाटील यांनी आज केली.

मराठवाड्यातील दुष्काळाचा आढावा घेण्यासाठी नांदेड येथे नियोजन भवनात आयोजित बैठकीत ते बोलत होते. कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी मराठवाड्याचा आढावा घेतल्यानंतर आमदार कैलास पाटील आक्रमक झाले. मुख्यमंत्र्यांनी ५ ऑक्टोबरनंतर शेतीचे पंचनामे करण्याची घोषणा छत्रपती संभाजीनगर येथे केली. मराठवाड्यात केवळ ३० टक्के पाऊस झाला आहे. गेल्या ३५ दिवसांपासून पावसाने ओढ दिली आहे, त्यामुळे हातातोंडाशी आलेला घास हिरावून नेल्याने बळीराजा त्रस्त आहे. सोयाबीन, कापूस, उडीद या पिकावर परिणाम झाला असून, हि पिके वाळून गेली आहेत. त्यामुळे तारखेचा मुहूर्त न बघता तात्काळ दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी आमदार कैलास पाटील यांनी केली.

सरकारने तातडीने सरसगट शेतकर्‍यांना हेक्टरी ५० हजार रुपये मदत करावी, पिकविमा संदर्भातील ट्रिगर लागू करावेत, जलजीवनाची कामे तात्काळ पूर्ण करावीत, जलसंधारणाची कामे तात्काळ हाती घ्यावीत, जनावरांना बांधावरच चारा उपलब्ध करुन द्यावा, पिक कापणीच्या आधारे पिकविमा देण्यात यावा, ईमरजन्सी लोडशेंडीग तात्काळ बंद करण्यात यावी, धरणाचे पाणी राखून ठेवावे, आदी मागण्यांही त्यांनी यावेळी केल्या. अगोदरच दुष्काळ त्यात मोठ्या प्रमाणात लोडशेंडीग केली जात आहे. ग्रामीण भागात ही लोडशेंडीग बारा तासाच्या वर होत असल्याने उपलब्ध असलेल्या पाण्यात पिके तारण्यासाठी विजेची आवश्यकता असताना पूर्वसूचना न देता लोडशेंडीग केली जात आहे. होरपळलेल्या शेतकर्‍यांना या लोडशेंडीगने त्रास होत असून, हि लोडशेंडीग तात्काळ बंद करावी, अशी मागणीही आमदार कैलास पाटील यावेळी केली. त्यांच्यासमवेत आमदार दिलीप स्वामीही उपस्थित होते.

Comments are closed.