दुष्काळावर चर्चा तिथे मंत्र्यांचा काजू बदामावर ताव, नांदेडात आढावा बैठकीत फिस्ट

मराठवाडय़ातील शेतकऱ्यांच्या दुष्काळी परिस्थितीची व्यथा जाणून घेण्यासाठी नांदेडच्या जिल्हा नियोजन सभागृहात शनिवार, 19 सप्टेंबर रोजी कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या उपस्थितीत पीक परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. मात्र, या गंभीर बैठकीदरम्यान लोकप्रतिनिधी काजू-बदामांचा आस्वाद घेत असल्याचे चित्र दिसून आले. दुष्काळावर चर्चा तिथे मंत्र्यांचा काजू-बदामावर ताव, अशी चर्चा सुरू झाली. ही बैठक खरोखरच दुष्काळग्रस्त शेतकऱयांच्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी होती की काजू-बदाम खात गप्पा मारत असल्याने दुष्काळाच्या चर्चेचीच खिल्ली उडवल्याची भावना शेतकरी वर्गात निर्माण झाली आहे.

दुष्काळी परिस्थितीबाबत पत्रकबाजी करून पाठ थोपटून शेतकऱयांची सहानुभूती मिळवणारे लोकप्रतिनिधींनी बैठकीकडे पाठ फिरवली. तसेच मराठवाडय़ातील आठही जिह्यांतील पालकमंत्र्यांपैकी परभणीच्या पालकमंत्री मेघना बोर्डीकर या एकमेव पालकमंत्री या बैठकीस उपस्थित होत्या.

मराठवाडय़ात पावसाने पाठ फिरवल्याने खरीप हंगाम संकटात सापडला आहे. अनेक भागांत पावसाचा मोठा खंड पडल्याने सोयाबीन, कापूस यांसह विविध पिके करपून जाण्याच्या मार्गावर आहेत. एका बाजूला पावसाअभावी सोयाबीनच्या शेंगा भरल्या नाहीत, कापसाची वाढ खुंटली आणि शेतकऱयांच्या वर्षभराच्या मेहनतीवर संकट कोसळले आहे. पावसाने ओढ दिल्याने हदगाव, अर्धापूर, मुदखेड या तालुक्यांतील शेतकऱयांनी ट्रक्टरने तसेच हाताने सोयाबीनची पिके उपटून काढली आहेत. त्यात सरकारने पाच तारखेची मुदत दिल्याने शेतकरी संतप्त झाला आहे. दुसऱया बाजूला वातानुकूलित सभागृहात दुष्काळावर चर्चा आणि टेबलावर काजू-बदामांची रेलचेल, हे चित्र शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणारे ठरू नये का, असा सवाल आता उपस्थित होत आहे. दुष्काळी बैठकीत शेतकऱयांच्या व्यथांपेक्षा पाहुणचाराला अधिक महत्त्व मिळत असेल, तर अशा बैठकांचा नेमका उपयोग काय?, असा सवाल शेतकऱयांनी उपस्थित केला आहे. सोशल मीडियावर काजू-बदाम खातानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर बैठक संपल्यानंतर तब्बल दीड तासाने लोकप्रतिनिधींच्या समोर ठेवलेल्या काजू-बदामच्या प्लेट प्रशासनाने हटविल्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.

काजूबदामावर मुख्यमंत्र्यांची नाराजी

दुष्काळ आढावा बैठकीत मंत्री आणि लोकप्रतिनिधींच्या ताटात काजू-बदाम ठेवल्याच्या प्रकारावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाराजी व्यक्त केली. शासकीय बैठकांमध्ये ड्रायफ्रूट्स ठेवण्याची प्रशासनाची एक पारंपरिक पद्धत असते, पण अशा गंभीर विषयांच्या बैठकीत परिस्थितीचे भान ठेवायला हवे, अधिकाऱयांनी त्याबाबतीत संवेदनशीलता बाळगलीच पाहिजे, असे फडणवीस यांनी म्हटले आहे. केंद्राच्या आर्थिक मदतीची अजिबात वाट न पाहता राज्य शासन आपल्या स्वतःच्या तिजोरीतून बळीराजाला तातडीने आर्थिक व इतर सर्वतोपरी मदत देईल, अशी ग्वाहीसुद्धा त्यांनी दिली आहे.

दुष्काळ म्हणून कोणी खात नाही का? परभणीचे गद्दार खासदार संजय जाधव माध्यमांवरच भडकले

परभणीचे मिंधे गटाचे गद्दार खासदार संजय ऊर्फ बंडू जाधव यांनी माध्यमांशी प्रतिक्रिया देताना सांगितले की, बैठकीच्या वेळी कोणता मेनू ठेवायचा हा प्रशासनाचा भाग आहे. आम्ही साडेसात वाजता दुष्काळाच्या बैठकीला परभणीहून निघालो, नाश्ताही केला नाही, समोर काजू-बदाम दिसले ते आम्ही खाल्ले, त्यात आमचा दोष काय, असा सवाल केला. 50-100 रुपयांच्या बदामावरून राईचा पर्वत करू नका, दुष्काळ म्हणून कोणी खात नाही का? असे म्हणत माध्यमांवरच भडकल्याचे पाहायला मिळाले.

हिंगोलीत कृषीमंत्र्यांना शेतकऱयांनी दिले गिफ्ट

या वादाच्या पार्श्वभूमीवर हिंगोली जिह्यातील वसमत येथे शिवसेनेसह शक्तिपीठ महामार्ग बाधित शेतकऱयांनी कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांचा ताफा अडवून त्यांना काजू -बदामाची प्लेट भेट दिली. बैठकीत काजू-बदाम काय खाता नुकसानग्रस्तांच्या बांधावर जाऊन खा, अशी भावना शेतकऱयांनी व्यक्त केली.

दुष्काळी परिस्थितीवर मीठ चोळण्याचा प्रकार – आमदार कैलास पाटील

दुष्काळी बैठकीत लोकप्रतिनिधींची अनुपस्थिती ही शेतकऱयांच्या दुष्काळी परिस्थितीवर मीठ चोळण्यासारखे आहे. सरकारने कर्जमाफी केली, पण कर्जमाफी अजून लागू झाली नाही. शेतातील पिके करपून जात आहेत. त्यामुळे शेतकऱयांच्या डोळय़ात अश्रू निर्माण झाले आहेत. हे सरकारला दिसत नाही का, अशी संतप्त प्रतिक्रिया शिवसेनेचे आमदार कैलास पाटील यांनी दिली, तर प्रशासनाने शेतकरी अडचणीत असताना काजू-बदामचा घाट कशासाठी घातला, असा सवालही त्यांनी केला.

Comments are closed.