पर्वतांपासून वाळवंटापर्यंत: भारत-अमेरिका 'युद्ध अभ्यास'

अल्ट्रा लाईट हॉवित्झरद्वारे प्रत्यक्ष गोळीबाराचा सराव : दोन्ही सैन्यांमधील आंतरकार्यक्षमता मजबूत करण्याचा उद्देश

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

भारतीय आणि अमेरिकन सैनिकांचा सध्या भारतात वेगवेगळ्या ठिकाणी ‘युद्धाभ्यास’ हा संयुक्त लष्करी सराव सुरू आहे. उत्तराखंडमध्ये चीनच्या सीमेजवळ पार पडलेल्या सरावानंतर आता एम-777 अल्ट्रा लाईट हॉवित्झरचा समावेश असलेले विशेष उपक्रम पार केले जात आहेत. दोन्ही सैन्यांमधील हा सराव नुकताच राजस्थानमधील महाजन फील्ड फायरिंग रेंज येथे पार पडला. एम-777 अल्ट्रा लाईट हॉवित्झरच्या तैनातीनंतर, दृश्यमान लक्ष्यांवर थेट मारा करण्याच्या पद्धतीचा वापर करून प्रत्यक्ष गोळीबार करण्यात आला. या सरावात अंदाजे 600 भारतीय आणि अमेरिकी लष्करी जवान सहभागी झाले आहेत.

भारत-अमेरिका संयुक्त लष्करी सरावाला उत्तराखंडमधील औली येथे सुरुवात झाली. उद्घाटन सोहळा औली परदेशी प्रशिक्षण केंद्रात पार पडला. हा सराव राजस्थानमधील महाजन फील्ड फायरिंग रेंजमध्येही आयोजित केला जात आहे. 15 सप्टेंबर रोजी सुरू झालेल्या ‘युद्धाभ्यास 2026’च्या 22 व्या आवृत्तीचा भाग 28 सप्टेंबरपर्यंत सुरू राहील आणि यात आणखी अनेक महत्त्वाचे सराव नियोजित आहेत. अल्ट्रा लाईट हॉवित्झरच्या तोफ पथकांनी उत्कृष्ट व्यावसायिकता, अचूकता आणि युद्धसज्जता दाखवत, सर्व निर्धारित लक्ष्यांवर यशस्वीपणे मारा करून त्यांना नष्ट केले. गोळीबारानंतर अमेरिकी पथकाने तोफखान्याच्या ठिकाणांना भेट देत यूएलएच बॅटरीच्या अधिकारी व सैनिकांशी संवाद साधत व्यावसायिक ज्ञान आणि सर्वोत्तम कार्यपद्धतींची देवाण-घेवाण केली.

या युद्धाभ्यासाचा उद्देश दोन्ही सैन्यांमधील आंतरकार्यक्षमता मजबूत करणे, उदयोन्मुख आव्हानांना सामोरे जाणे आणि द्विपक्षीय संरक्षण भागीदारी अधिक दृढ करणे हा आहे. या सरावाचा उद्देश डोंगराळ आणि निम-डोंगराळ प्रदेशात एकात्मिक युद्ध गटांच्या वापरासाठी दोन्ही सैन्यांची संयुक्त लष्करी क्षमता वाढवणे हा असून त्यामध्ये भूदल आधारित कारवायांवर विशेष भर दिला जात आहे.

निगराणीसाठी ड्रोन आणि स्वायत्त प्रणालींचा वापर

या प्रशिक्षणात निगराणीसाठी ड्रोन आणि स्वायत्त प्रणालींचा वापर, तसेच महाजन फील्ड फायरिंग रेंजवर आधुनिक शस्त्रप्रणालींचे प्रात्यक्षिक यांचा समावेश आहे. भारतीय आणि अमेरिकी सैन्य संयुक्तपणे लढाऊ कौशल्ये आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या सामर्थ्याची चाचणी घेत आहेत. या सरावादरम्यान, प्रत्यक्ष कारवाईत उद्भवू शकणाऱ्या संभाव्य धोक्यांवेळी कशापद्धतीने बचाव करावा यासंबंधीचे प्रशिक्षण जवानांनी घेतले. हे सहकार्य दोन्ही देशांमधील संरक्षण संबंध अधिक दृढ करत आहे.

भारतीय आणि अमेरिकी लष्कर आधुनिक दहशतवादविरोधी कारवायांसाठी सज्ज असल्याचे ‘युद्धाभ्यास 2026’ने दाखवून दिले. ड्रोन आणि रोबोटिक श्वानांसारख्या तंत्रज्ञानाच्या वापरामुळे सैनिकांची सुरक्षा वाढते आणि कार्यात्मक कार्यक्षमता सुधारते. आतापर्यंतच्या सरावांमध्ये हल्ला पथके, ड्रोन, रोबोटिक श्वान, प्रशिक्षित श्वान आणि स्नायपर्स यांचा समावेश होता. त्यांनी विविध विशेष पथके आणि तंत्रज्ञानाचा वापर करून कारवाया कशा करायच्या याचाही सराव केला. अमेरिकी लष्कराच्या सैनिकांनी भारतीय सैनिक आणि वापरल्या जाणाऱ्या उपकरणांचे बारकाईने निरीक्षण केले. त्यांनी या मोहिमेत सहभागी असलेल्या सैनिकांशी संवाद साधत तंत्रे व पद्धती समजून घेतल्या.

Comments are closed.