गायक सरगम वैश यांचा ‘व्वान’ चित्रपट निर्मात्यांवर गंभीर आरोप; परवानगीशिवाय गाणे वापरल्याचा दावा, कायदेशीर कारवाईचा इशारा
सिद्धार्थ मल्होत्रा आणि तमन्ना भाटिया यांचा आगामी चित्रपट ‘व्वान: फोर्स ऑफ द फॉरेस्ट’ हा येत्या 25 सप्टेंबरला प्रदर्शित होणार आहे. परंतु या चित्रपटाच्या ट्रेलरमधील गाण्यावरून आता वादंग निर्माण झाला आहे. गायक सरगम वैश याने ट्रेलरमध्ये त्यांचे मूळ गाणे परवानगी किंवा संमतीशिवाय वापरल्याचा आरोप केला आहे. त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत हे गाणे ट्रेलर आणि प्रमोशनल मटेरियलमधून काढून टाकण्याची मागणी केली आहे.
टाइम्स आॅफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार सरगम वैश यांनी शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये म्हटले आहे की, त्यांनी ‘द व्वान – अधिकृत ट्रेलर’ पाहिला असता त्यांचे मूळ गाणे वापरल्याचे त्यांच्या लक्षात आले. मात्र, ट्रेलर किंवा चित्रपटाच्या प्रमोशनसाठी गाणे वापरण्याची त्यांनी कोणतीही परवानगी दिलेली नसल्याचा दावा त्यांनी केला.
सरगम यांनी या प्रकरणाचे गांभीर्यही स्पष्ट केले आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, हे गाणे आधीच एका मोठ्या संगीत लेबलसोबतच्या कराराचा भाग आहे. त्यामुळे त्यांच्या परवानगीशिवाय गाण्याचा वापर झाल्यास त्यांच्या विद्यमान करारावरही परिणाम होऊ शकतो, असा दावा त्यांनी केला.
कलाकारांच्या कामाचा आदर केला पाहिजे आणि कोणत्याही कलाकाराचे संगीत त्यांच्या परवानगीशिवाय वापरले जाऊ नये, असेही त्यांनी म्हटले आहे. सदर प्रकरणात सरगम यांनी ‘व्वान’च्या संबंधित टीमला थेट आवाहन करत ट्रेलर आणि इतर प्रमोशनल मटेरियलमधून त्यांचे गाणे काढून टाकण्याची मागणी केली आहे. तसेच, गाणे वापरण्यासाठी त्यांच्याकडे कोणतीही वैध परवानगी किंवा परवाना असल्यास त्याची माहिती देण्यास सांगितले आहे. त्यांनी सोशल मीडिया यूजर्सनाही ही पोस्ट शेअर करून संबंधित टीमपर्यंत हा मुद्दा पोहोचवण्याचे आवाहन केले आहे. गाणे ट्रेलरमध्ये कायम राहिल्यास आपली कायदेशीर टीम या प्रकरणाची चौकशी करेल, असे सरगम यांनी व्हिडिओमध्ये म्हटले आहे. त्यामुळे ‘व्वान’च्या टीमने त्यांच्या आरोपांवर काय भूमिका घेतली आहे, याकडे आता लक्ष लागले आहे.
Comments are closed.