मराठी जगवा अन् टिळकजी क्षमा करा; आपल्या महानगरच्या वाचकांची पर्यावरणपूरक सजावट
मुंबई : वाढत्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर अनेकजण पर्यावरण गणेशोत्सव साजरा करताना दिसत आहेत. इको-फ्रेंडली गणेशोत्सव साजरा करण्यासाठी मातीची मूर्ती आणि नैसर्गिक साहित्यापासून केलेली सजावट उत्तम पर्याय आहे. आपलं महानगरच्या वाचकांनी देखील आपल्या घरी केलेली पर्यावरण सटावटीचे फोटो पाठवले आहेत. ते एकदा पाहूया…
तन्मय कदम यांनी “अभिजात दर्जा मिळाला, आता मराठी जगवा” या संकल्पनेतून आपल्या गणपती बाप्पासाठी देखावा साकारला आहे. “मराठी ही केवळ आपली भाषा नाही, तर आपल्या मातीची, संस्कृतीची आणि अस्मितेची ओळख आहे.
कारण अभिजात दर्जा मिळणे हा मराठीचा सन्मान आहे, पण तो दर्जा जिवंत ठेवणे ही आपली जबाबदारी आहे. त्यामुळे तन्मय कदम यांनी “मराठीला अभिजात दर्जा मिळाला, आता ती जगवणार कोण?” असा प्रश्न उपस्थित केला आहे.
बदलापूर येथील सार्थक सुर्वे यांनी “टिळकजी क्षमा करा!” या संकल्पनेतून देखावा साकारला आहे. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी ज्या हेतुसाठी सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरवात केली, त्या राष्ट्रीय आणि सामाजिक कारणांना हरताल फासण्याचे काम गेल्या काही काळापासून सुरू आहे, त्यामुळे सुर्वे कुटुंबाने आपल्या गणपती बाप्पाच्या आरासाचे शीर्षक “टिळकजी क्षमा करा!” असे ठेवले आहे. सुर्वे कुटुंबाने आरासाच्या माध्यमातून संदेश देण्याचा तसेच समाज प्रबोधन, जनजागृती करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे.
प्रवीण भिवपूरकर यांनी आपल्या घरचा गणपती “कैलाश पर्वताच्या पायथ्याशी बाप्पा विराजमान” केला असून इको फ्रेंडली सटावट केली आहे. यासाठी त्यांनी पुठ्ठयाचा मोठा डबा, जुनी वर्तमानपत्रे, फेविकॉल, प्लायवूड, मातीच्या विटा, छोटी दगडी, बांबूच्या काठ्या, विविध रंगांचे कार्ड पेपर, लाकडी पट्ट्या, माती, कापूस, त्रिशूल, डमरू, पोस्टर रंग, कागदी फुले, कापड, चुन्याची पावडर इत्यादी साहित्य वापरून भिवपूरकर कुटुंबाने सजावट केली आहे.
‘धातूची मूर्ती प्रदूषणापासून कायमची मुक्ती’ या संकल्पने अंतर्गत बालपण स्कूल पानोडी मध्ये पुस्तकांच्या देखाव्यातून पंचधातूची गणेश मूर्ती साकारण्यात आली आहे.
अहिल्यानगर जिल्ह्याच्या संगमनेर तालुक्यातील बालपण स्कूल पानोडी ही शाळा मागील दहा वर्षापासून पर्यावरण रक्षणाचे कार्य करत आहे. हे कार्य करत असताना प्रत्येक वर्षी पर्यावरण पूरक पद्धतीने गणेशोत्सव साजरा केला जातो. याही वर्षी प्रदूषण होऊ नये म्हणून प्रदूषणापासून कायमची मुक्ती मिळविण्यासाठी पंचधातूच्या मूर्तीची स्थापना करून कायमस्वरूपी प्रदूषण वाचविण्याचे काम बालपण स्कूलच्या चिमुकल्यांच्या माध्यमातून केले जात आहे.
ओंकार गावडे यांनी सजावटीला ‘दक्षिणेचा सांस्कृतिक साज’ देण्याचा प्रयत्न केला आहे. गावडे कुटुंबाच्या घरातील बाप्पाची मूर्ती शाडू मातीची असून त्यांनी सजावटीसाठी नारळाची झावळी, रंगीत कागद, पुठ्ठा, नैसर्गिक रंग, लोकर आणि शाडू माती यांसारख्या पर्यावरणपूरक साहित्याचा वापर केला आहे. नेत्तिपट्टम, कथकली मुखवटे, चुंदन वल्लम (ओनम होडी) आणि शाडू मातीचे उंदीर मामा अशा विविध कलाकृती पर्यावरणपूरक साहित्यापासून साकारून बाप्पाची सजावट करण्यात आली आहे. तसेच या सजावटीतून दक्षिण भारतीय संस्कृतीची सुंदर झलक आणि पर्यावरणपूरकतेचा संदेश देण्याचा छोटासा प्रयत्न गावडे कुटुंबाने केला आहे.
Comments are closed.