सोमवारपासून शरद पवार बांधावर
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी राज्यातील दुष्काळी परिस्थिती अत्यंत गंभीर होत चालल्यानंतरही सरकार तातडीची पावले उचलत नसल्याने स्वतः मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या सोमवार, 28 सप्टेंबरपासून ते दुष्काळग्रस्त भागाचा दौरा करणार आहेत. या दौऱ्यात थेट शेतीच्या बांधावर जाऊन ते शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत.
शेतकऱ्यांना तातडीने हेक्टरी 50 हजार रुपये तर शेतमजुरांना 25 हजार रुपये मदत द्यावेत, या मागणीसह चारा छावण्या व अन्य आवश्यक मागण्या त्यांनी नमूद केल्या होत्या, परंतु त्यावर सरकारकडून अपेक्षित कृती अद्याप झालेली नाही. सरकार पंचनाम्यांची प्रतीक्षा करत आहे आणि त्यासाठी 5 ऑक्टोबरचा मुहूर्तही ठरवला आहे. दुसरीकडे दुष्काळाची तीव्रता वारंवार वाढत चालली असल्याने शरद पवार स्वतः शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्यासाठी जाणार आहेत.
शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून दुष्काळी परिस्थितीची जाणीव करून दिली होती. निकषांची वाट न पाहता तातडीने दुष्काळ जाहीर करा असा सल्ला त्यांनी सरकारला दिला होता.
Comments are closed.