हाऊस बोट, क्रूज, बीच इव्हेंटचे परवाने 15 दिवसांत मिळणार; कोकणातील बेरोजगार तरुणांना सुवर्णसंधी
कोकणातील बेरोजगार तरुण पोटापाण्यासाठी मुंबई, पुण्याकडे वळतात. पण आता कोकणामध्येच राहून त्यांना रोजगाराची संधी मिळू शकणार आहे. जलपर्यटनाच्या माध्यमातून त्यांच्यासाठी या संधींची दारे खुली झाली आहेत. कोकण किनारपट्टीवर हाऊसबोट, क्रूझ किंवा बीच इव्हेंट करण्यासाठी आवश्यक परवाने आता 3 ते 15 दिवसांत मिळणार आहेत. सेवा हमी कायद्याच्या दणक्यामुळे आता असे परवाने वेळीच मिळू शकणार आहेत.
महाराष्ट्र सागरी मंडळाच्या कार्यालयांत मंजुरीसाठी हजारो अर्ज अनेक महिने पडून होते. टेबलाखालून चिरीमिरी मिळावी या आशेने संबंधित अधिकाऱ्यांनी ते अर्ज जाणीवपूर्वक रखडून ठेवले होते. सेवाहमी कायद्यानुसार अर्जांचा निपटारा वेळीच व्हावा अशी तरतूद आहे. राज्य शासनाने या कायद्याचा बडगा सागरी मंडळावर उगारला आहे. मंडळाशी संबंधित 11 महत्त्वाच्या सेवांसाठी शासनाने 1 ते 15 दिवसांची कालमर्यादा निश्चित केली आहे. तसेच त्यात दिरंगाई झाल्यास संबंधित अधिकाऱ्यावर कारवाईचा इशाराही देण्यात आला आहे. गृह विभागाने (बंदरे व परिवहन) यासंदर्भात अधिसूचना जारी केली आहे.
खुल्या समुद्रात आयोजित जलतरण स्पर्धेत सहभागी होणाऱ्या क्रीडापटूंना पोहण्यासाठीही परवाना घ्यावा लागतो. त्यांचे अर्जच सागरी मंडळाच्या अधिकाऱ्यांनी दाबून ठेवल्याने त्यांना स्पर्धेपासून वंचित राहावे लागत होते. आता त्यांना पोहण्याचे परवाने 3 दिवसांत देणे बंधनकारक आहे.
क्रूझसाठी २४ तासांत परवाना न दिल्यास कारवाई
समुद्रकिनाऱ्यावर सांस्कृतिक, पर्यटन अथवा खाजगी कार्यक्रमांच्या आयोजनासाठी प्रादेशिक बंदर अधिकारी 7 दिवसांत परवानगी देतील. सागरी नकाशे व भरती-ओहोटी पुस्तिका अर्ज केल्यानंतर एका दिवसात मिळेल. जहाजांच्या ये-जा करण्यासाठीचा दाखला तर 24 तासांत न दिल्यास अधिकाऱ्याला कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. प्रवासी सुरक्षिततेसाठी आवश्यक असणारे बोटींचे तांत्रिक सर्वेक्षण सागरी अभियंता व मुख्य सर्वेक्षकांना कमाल 45 दिवसांत पूर्ण करावे लागेल.
Comments are closed.