मुरबाडमधून १ लाख ३४ हजार मतदार उडवले, मतदार यादीत ‘कुछ तो गडबड है’
मुरबाड विधानसभा मतदारसंघाच्या यादीतून तब्बल एक लाख ३४ हजार ४०६ मतदारांची नावे उडवण्यात आली आहेत. एकूण मतदारांच्या तुलनेत हे प्रमाण २७.३२ टक्के आहे. मुरबाड विधानसभा मतदारसंघात मतदार यादीचे पुनरीक्षण करण्यापूर्वी चार लाख ९१ हजार ९८० मतदारांची नोंद होती. नव्याने जाहीर करण्यात आलेल्या मतदार यादीत तीन लाख ५७ हजार ५७४ मतदारांचा समावेश आहे. मात्र १ लाखांहून अधिक नावे यादीतून वगळल्याने ‘कुछ तो गडबड है’ अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.
निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार मुरबाड विधानसभा मतदारसंघाची विशेष सखोल पुनरीक्षणअंतर्गत नवी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. आता या यादीमध्ये मुरबाड विधानसभा मतदारसंघात तीन लाख ५७हजार ५७४ मतदारांचा समावेश करण्यात आला असून जुन्या यादीतील एक लाख ३४ हजार ४०६ मतदारांची नावे वेगवेगळ्या कारणांमुळे वगळण्यात आली आहेत. दरम्यान नव्याने जाहीर केलेल्या प्रारूप मतदार यादीनुसार मुरबाड विधानसभा मतदारसंघातील पुरुष मतदारांची संख्या १ लाख ८३ हजार २६२ तर महिला मतदारांची संख्या १ लाख ७४ हजार ३०५ इतकी आहे. तृतीयपंथी मतदारांची संख्या अवघी ७ एवढी आहे.
३२ हजार मतदारांच्या नावांमध्ये तफावत
मुरबाड विधानसभा मतदारसंघातील एकूण ६६ हजार ११३ मतदारांची सुनावणी घेण्यात येणार आहे. त्यापैकी ३३ हजार ५८५ मतदारांचे मॅपिंग झालेले नाही तर ३२ हजार ५२८ मतदारांच्या नावांमध्ये तफावत आढळून आलेली आहे. या सुनावणीसाठी २१ ठिकाणे निश्चित करण्यात आली आहेत. बदलापूरमध्ये ११, अंबरनाथ २, कल्याण २, मुरबाड शहर एक व मुरबाड ग्रामीणमध्ये ५ ठिकाणी सुनावणी घेण्यात येणार आहे, अशी माहिती मुरबाड तहसीलदार अभिजित देशमुख यांनी दिली.
हरकती नोंदवण्याची मुदत ३० सप्टेंबरपर्यंत
मुरबाड विधानसभा मतदारसंघात मुरबाड नगर पंचायत, कुळगाव-बदलापूर नगर परिषद, मुरबाड, अंबरनाथ आणि कल्याण तालुक्यांच्या ग्रामीण भागांचा समावेश आहे. मतदार यादीचे पुनरिक्षण करण्यापूर्वी ४ लाख ९१ हजार ९८० मतदारांची नोंद होती. नव्याने जाहीर करण्यात आलेल्या मतदार यादीत ३ लाख ५७ हजार ५७४ मतदारांचा समावेश आहे. दरम्यान मतदार यादीतून नावे वगळण्यात आलेल्या मतदारांचे दावे व हरकती नोंदवण्याची मुदत ३० सप्टेंबरपर्यंत आहे.
Comments are closed.