Fatigue recovery: सणासुदीच्या धावपळीतून मिळवा रेस्ट

सण म्हटलं की पूजा, पाहुणचार, प्रवास, नानाविध पदार्थांचा आस्वाद आणि उशिरापर्यंत जागणं आलंच. काही दिवसांची ही धावपळ संपल्यानंतर मात्र शरीराला थकवा जाणवतो. अशावेळी पुन्हा ताजंतवानं वाटण्यासाठी लगेच कठीण व्यायाम किंवा कडक डाएट करण्याची गरज नाही. तर काही सोप्या गोष्टी लक्षात घेतल्या तरी शरीराला रिकव्हर होण्यास मदत होऊ शकते. जाणून घेऊयात थकवा घालवण्यासाठीचे काही स्मार्ट उपाय

हायड्रेट राहा
सणांच्या दिवसांत पाणी कमी प्यायलं जातं. त्यामुळे दिवसभर पुरेसं पाणी प्या. ताक, सूप किंवा लिंबू पाणी यांसारखे साधे पर्यायही घेऊ शकता. ओआरएसची गरज प्रामुख्याने जुलाब, उलट्या किंवा जास्त घामामुळे शरीरातील पाणी-क्षार कमी झाल्यास असते; रोजच्या थकव्यासाठी ते आवश्यक नाही.

हलका आहार
सतत गोड, तळलेले आणि जड पदार्थ खाल्ल्यानंतर पुढील काही दिवस घरचं साधं जेवण घ्या. डाळ, भाजी, भात किंवा पोळी, खिचडी, दही-ताक यांचा आहारात समावेश करा.

चांगली झोप

सणांमध्ये कमी झालेली झोप भरून काढण्यासाठी रात्री पुरेशी झोप घेण्याला प्राधान्य द्या. दुपारी झोप घ्यायची असल्यास 15 ते 20 मिनिटांची छोटी झोप ताजेतवाने वाटण्यास मदत करू शकते.

हालचाल करा

थकवा जाणवत असताना जड व्यायाम करण्याऐवजी हलकं स्ट्रेचिंग, चालणं किंवा योगासनं करा. सतत बसून राहण्यापेक्षा थोडी हालचाल शरीराला फ्रेश वाटण्यास मदत करू शकते.

मी-टाईम

सणांचे फोटो, व्हिडिओ आणि मेसेज पाहण्यात तासन्तास मोबाइल हातात राहतो. दिवसातील काही वेळ मोबाइल आणि सोशल मीडियापासून दूर राहून शांत वेळ घ्या. शरीरासोबत मनालाही हा ब्रेक गरजेचा आहे. त्यामुळे, स्वतःसाठी वेळ काढा आवडीचे संगीत ऐका, पुस्तक वाचा किंवा एखादे रिलॅक्सिंग गरम पाण्याचे स्नान (Warm bath) घ्या.

Comments are closed.