विश्वचषक विजेत्या वेगवान गोलंदाजाचा आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला रामराम! डॉक्टरांच्या सल्ल्यामुळे घेतला निवृत्तीचा निर्णय

इंग्लंडचा वेगवान गोलंदाज मार्क वूडने मंगळवारी (22 सप्टेंबर) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. त्याने इन्स्टाग्रामवर एका भावनिक पोस्टद्वारे ही माहिती दिली आणि स्पष्ट केले की, वैद्यकीय सल्ल्यानुसार कसोटी आणि 50 षटकांचे क्रिकेट खेळणे आता शक्य नसल्याने त्याने हा निर्णय घेतला आहे.

वूडने 2015 मध्ये आंतरराष्ट्रीय पदार्पण केले होते. जवळपास एक दशक इंग्लंडसोबत खेळलेल्या वूडने दुखापतींमधून सावरण्यासाठी आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करण्यासाठी कठोर मेहनत केली. मात्र संघाबाहेर एका कठीण काळानंतर त्याने थांबण्याचा निर्णय घेतला. त्याचा शेवटचा सामना नोव्हेंबर 2025 मध्ये पर्थ येथे झालेल्या ऍशेस कसोटी मालिकेतील होता.

वूडने इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या पोस्टमध्ये लिहिले, “मी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या वर्षभरातील घडामोडी पाहता हे आश्चर्यकारक वाटणार नाही, पण माझ्या कराराच्या शेवटी ही एक स्वाभाविक वेळ आहे असे मला वाटते.”

“मी नेहमीच कणखर राहण्याचा आणि दुखापतीतून सावरत लोकांना चुकीचे ठरवून मी काय करू शकतो हे सर्वांना दाखवून देण्याचा प्रयत्न केला आहे. दुर्दैवाने, यावेळी मी ही लढाई हरलो. वैद्यकीय सल्ल्यानुसार, कसोटी क्रिकेट आणि 50 षटकांचे क्रिकेट खेळणे शक्य नाही, त्यामुळे गेल्या वर्षभरात इंग्लंडकडून खेळण्याचे माझे स्वप्न हळूहळू पुसले गेले आहे,” असेही वूडने पुढे त्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

वूडने म्हटले, “इंग्लंडकडून खेळणे हा माझ्यासाठी सर्वात मोठा सन्मान आणि एक स्वप्नपूर्ती आहे. इंग्लंडसाठी इतके खेळायला मिळाल्याने माझ्या मनातील लहान मुलाला खूप आनंद झाला असता. जगभर प्रवास करणे, अविश्वसनीय लोकांना भेटणे आणि सर्वोत्कृष्ट खेळाडूंविरुद्ध खेळणे, हे सर्व मला खूप आवडते आणि तेही माझ्या आवडीचे काम करत असताना.”

वूडने इंग्लंडसाठी 39 कसोटी सामन्यांच्या 71 डावांमध्ये 119 विकेट्स घेतल्या. तसेच, त्याने पाच प्रसंगी एका डावात पाच विकेट्स घेतल्या.

तसेच त्याने 70 एकदिवसीय सामन्यांमध्ये, इंग्लंडच्या या वेगवान गोलंदाजाने 80 विकेट्स आणि 38 टी 20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 54 विकेट्स घेतल्या. तो इंग्लंडच्या 2019 एकदिवसीय आणि 2022 टी 20 विश्वचषक विजेत्या संघांचा भागही राहिला आहे. (England Pacer Mark Wood announced his retirement from international cricket)

Comments are closed.