कपाट आवरण्याचे स्मार्ट फंडे; हेवी कपड्यांची अशी घ्या काळजी
दहा दिवसांचे बाप्पा अजूनही घरोघरी, मोठमोठ्या मंडळात विराजमान आहेत. परंतू दीड, पाच, सात दिवसांच्या बाप्पांचे विसर्जन झाले आहे. त्यामुळे हळूहळू घर आवरण्यास सुरूवात झाली आहे. गणेशोत्सव संपला की घरातील धावपळ थोडी कमी होते. पण यादरम्यान घरात सर्वात मोठे काम उरते ते म्हणजे कपड्यांचा पसारा आवरणे. सणासुदीच्या काळात नेसलेल्या भारी साड्या, नऊवारी, लेहेंगा आणि हेवी ड्रेसेस थेट कपाटात कोंबून ठेवल्यास ते खराब होऊ शकतात. त्यामुळे आज आपण या संदर्भातील टिप्स पाहूयात,
हेवी कपड्यांची काळजी कशी घ्यावी?
हवेशीर जागी ठेवणे
सणात घातलेले हेवी ड्रेसेस किंवा साड्या लगेच धुवायला किंवा कपाटात ठेवू नये. घाम आणि ओलसरपणा जाण्यासाठी ते 2 ते 3 तास घरात सावलीत किंवा पंख्याखाली ठेवावेत. थेट उन्हात ठेवल्यास या कपड्यांचा रंग उडण्याची शक्यता असते.
ड्रायक्लीन आणि डाग तपासणे
कपड्यांवर कुठे तेल, हळद, प्रसाद किंवा कुंकवाचा डाग लागला असेल तर तो घरी घासून काढण्याचा प्रयत्न करू नये. असे हेवी ड्रेसेस किंवा रेशमी साड्या थेट ड्रायक्लीनला द्यावेत.
कापडी पिशव्यांचा वापर
भारी साड्या आणि ड्रेसेस कधीही प्लॅस्टिकमध्ये पॅक करू नये. प्लॅस्टिकमुळे कपड्यांना हवा मिळत नाही आणि झरी काळी पडू शकते. त्याऐवजी मलमलच्या, जुन्या सुती ओढणीत किंवा कॉटनच्या कव्हरमध्ये ते गुंडाळून ठेवावेत.
घड्या बदलणे
पैठणीच्या घड्या दर 3 ते 4 महिन्यांनी बदलत राहावे. एकाच ठिकाणी घडी राहिल्याने साडी तिथून फाटण्याची शक्यता असते.
कपड्यांचा पसारा कसा आवरावा?
-
पसारा आवरताना कपड्यांची विभागणी करावी. जे कपडे फक्त सणांनाच घातले जातात, ते व्यवस्थित पॅक करून कपाटाच्या वरच्या कप्प्यात किंवा सुटकेसमध्ये ठेवावेत.
-
रोजच्या वापरातील, ऑफिसला घालण्याचे आणि कॅज्युअल कपडे कपाटात समोरच्या बाजूला ठेवावेत, जेणेकरून रोज सकाळी शोधाशोध करावी लागणार नाही.
-
कपड्यांना कुबट वास येऊ नये म्हणून कपाटात डांबर गोळ्या, सुक्या कडुलिंबाची पाने किंवा लवंग एका सुती कापडात बांधून ठेवावी. हे थेट झरीच्या कपड्यांना लागणार नाही याची काळजी घ्या.
- अजूनही दहा ते 12 दिवसांचे बाप्पा विराजमान आहेत. त्यामुळे 1 ते 2 साड्या किंवा ड्रेस घालण्यासाठी तुम्ही व्यवस्थित ठेवू शकता. बाकी सर्व गोष्टी आवरता येतील म्हणजे कामाचा लोड येणार नाही.
अशा साध्या आणि सोप्या पद्धतीने पसारा आवरल्यास तुमचे महागडे कपडे पुढच्या सणापर्यंत अगदी नव्यासारखे सुरक्षित राहतील.
हेही वाचा – सण-उत्सवांसाठी इलकल साडी ते कुर्ता
Comments are closed.