रूट व्यावसायिक क्रिकेटमधून निवृत्त! म्हणाला, “आयुष्यात खूप चढ-उतार आले…”

रूटने बुधवारी (23 सप्टेंबर) व्यावसायिक क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करताच क्रिकेट रसिकांना मोठा धक्का बसला. सचिन तेंडुलकरचे अनेक विक्रम मोडणाऱ्या रूटची नुकतेच इंग्लंड कसोटी संघाच्या कर्णधारपदी पुन्हा नियुक्ती झाली. तसेच तो सर्वाधिक कसोटी धावांच्या बाबतीत सचिनच्या अगदी जवळ होता, मग ही निवृत्ती कशी काय घेतली? झाले असे की, व्यावसायिक क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर हे जो रूटने नाही, तर त्याचा धाकटा भाऊ बिली रूटने केली आहे.
बिली रूटने सध्या सुरू असलेल्या काउंटी चॅम्पियनशीप डिव्हिजन वन 2026 मध्ये केवळ दोन सामने खेळले होते. तसेच ग्लॅमॉर्गन संघाच्या या फलंदाजाने क्लबच्या सेकंड इलेव्हनचे कर्णधारपदही भूषवले होते. त्याने या महिन्याच्या सुरूवातीला आपल्या व्यावसायिक क्रिकेटमधील शेवटचा सामना खेळला. त्यामधील दोन्ही डावांमध्ये मिळून त्याने केवळ 11 धावा केल्या.
बिलीने सोशल मीडियावर आपल्या निवृत्तीची घोषणा केली. तो म्हणाला, “दोन महान क्लबचे प्रतिनिधित्व करणे आणि चार ट्रॉफी जिंकण्याच्या यशात सहभागी होणे हा एक मोठा सन्मान आहे. मला लहानपणापासून आवडणाऱ्या गोष्टीतून करिअर करण्याची संधी मिळाल्याबद्दल मी स्वत:ला खूप भाग्यावान समजतो.”
“गेल्या 14 वर्षांत अनेक चढ-उतार आले, मात्र मी त्यातला एकही क्षण बदलणार नाही. यादरम्यान ज्यांनी माझ्यासोबत प्रवास केला त्या लोकांसाठी आणि लहानपणीचे स्वप्न जगण्याची संधी मिळाल्याबद्दल मी नेहमीच कृतज्ञ राहीन. यात हातभार लावलेल्या प्रत्येकाचे आभार मानतो,” असेही बिलीने त्या पोस्टमध्ये पुढे म्हटले आहे.
बिलीची कारकिर्द
बिलीने 2015 मध्ये प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. दोन वर्षांनंतर त्याने लिस्ट ए आणि टी 20 क्रिकेटमध्येही पदार्पण केले.
बिलीने 83 प्रथम श्रेणीचे सामने खेळले. त्यामध्ये सात शतके आणि 17 अर्धशतकांच्या सहाय्याने 4107 धावा केल्या. यामधील त्याची वैयक्तिक सर्वोच्च धावसंख्या 229 आहे. त्याने लिस्ट ए चे 60 सामने खेळताना तीन शतके आणि नऊ अर्धशकांच्या सहाय्याने 1665 धावा केल्या. तसेच त्याने 50 टी 20 सामन्यांमध्ये 634 धावा केल्या आहेत.
बिली हा ऑफ स्पिनरही आहे. त्याने प्रथम श्रेणीमध्ये आठ आणि लिस्ट ए क्रिकेटमध्ये सहा विकेट्सही घेतल्या आहेत.
Comments are closed.