हॉटेल ऐवजी होमस्टे का बरा?
गेल्या काही वर्षांपासून पर्यटक बाहेरगावी फिरायला गेल्यावर महागड्या हॉटेलमध्ये राहण्याऐवजी होमस्टेला अधिक पसंती देऊ लागले आहेत. कारण होमस्टे हा एक असा पर्याय आहे ज्यामुळे फिरण्याबरोबरच तेथील स्थानिक परंपरा , संस्कृती , खाद्य संस्कृतीचा जवळून अनुभव घेता येतो. त्याचबरोबर हॉटेलच्या तुलनेत होमस्टेमध्ये राहण्या खाण्याचा खर्चही कमी असतो. त्यामुळे टूर बजेटमध्ये होते. शिवाय होमस्टेमध्ये घरगुती वातावरण आणि घरगुती जेवण मिळते त्यामुळे स्थानिक खाद्याचा आस्वादही घेता येतो जो हॉटेलच्या जेवणात मिळत नाही.
यामुळे हल्ली सोलो ट्रॅव्हलर्स, बैकपैकर्स, कपल्स आणि कुटुंबही होमस्टेला पसंती देऊ लागले आहेत. प्रामुख्याने भारतात जर तुम्ही डोंगराळ ठिकाणी फिरायला जाणार असाल किंवा गेला असाल तर होमस्टे हा उत्तम पर्याय आहे. कारण बऱ्याच वेळा अशा ठिकाणी मोठे हॉटेल्स नसतात. आणि असले तर महागडे असतात. अशावेळी होमस्टे हा उत्तम पर्याय ठरतो. होमस्टेमध्ये तुम्ही स्थानिकांच्याच घरी त्यांच्यासोबत राहता. त्यामुळे त्यांच्याकडून तुम्हाला तेथील लहान सहान पर्यंटन स्थळांची अचूक माहीती मिळते.
पण गुगलवर होमस्टे निवडताना त्याची रेटींग, रिव्यू आणि फोटो नक्की तपासावे. तेथील सुविधा तपासाव्यात. गावात जाणाऱ्या रस्त्यांची माहीती मिळवावी. तसेच होमस्टे बुक करण्याआधी मालकाचीही माहीती रिव्यूच्या माध्यमातून तपासावी आणि जवळील व्यक्तीबरोबर शेअर करावी. त्यामुळे तुम्ही कुठे गेला आहात आणि कुठे मुक्कामी आहात हे कुटुंबातील इतर सदस्यांना माहीत असेल. एखाद्या कठीण प्रसंगी याच माहीतीच्या आधारे ते तुमच्यापर्यंत पोहचू शकतील.
Comments are closed.