टीएमसी आमदारांच्या वाहनावर हल्ला
ममता बॅनर्जींच्या सभेला जात असताना फेकली अंडी
वृत्तसंस्था/ कोलकाता
पश्चिम बंगालच्या हुगळी जिह्यात शनिवारी टीएमसी आमदार कुणाल घोष यांच्या गाडीवर हल्ला झाला. घोष हे श्रीरामपूर येथील ममता बॅनर्जींच्या सभेला जात असताना हा प्रकार घडला. उत्तरपारा येथे जमावाने त्यांच्या गाडीला घेराव घालत अंडी फेकली. या हल्ल्यात गाडीची मागची विंडशील्डही फुटली. या घटनेमागे भाजपचा हात असल्याचा आरोप टीएमसी नेत्यांनी केला आहे.
आमदार कुणाल घोष यांच्या कार्यालयाने हल्ल्याच्या घटनेचा व्हिडिओ ‘एक्स’वर पोस्ट केला आहे. व्हिडिओमध्ये कुणाल घोष ड्रायव्हरजवळच्या सीटवर बसलेले दिसत आहेत. तर काही लोक मागच्या सीटवर बसून व्हिडिओ चित्रित करत होते. गेल्या चार महिन्यांत घोष यांच्यावर झालेला हा तिसरा हल्ला आहे. 13 सप्टेंबर रोजी त्यांच्या घराची आणि कार्यालयाची तोडफोड करण्यात आली. तसेच 15 जून रोजी लोकांनी त्यांच्या डोक्यावर अंडी फेकली होती.
…हे जंगलराज: कुणाल घोष
या घटनेवर प्रतिक्रिया देताना कुणाल घोष यांनी राज्यात ‘जंगलराज’ सुरू असल्याचा आरोप केला आहे. माझ्या गाडीवर दगड आणि अंडी फेकण्यात आली, आणि रस्ता अडवण्यात आला. या प्रकारावेळी तिथे एकही पोलीस कर्मचारी उपस्थित नव्हता, असे त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. टीएमसीने या हल्ल्यासाठी भाजपला जबाबदार धरले आहे. हा सार्वजनिक निषेध नव्हता, तर भाजपने केलेला पूर्वनियोजित हल्ला होता, असे पक्षाचे नेते असित मजुमदार म्हणाले. दरम्यान, उत्तरपारा येथील भाजप आमदार दिपांजन चक्रवर्ती यांनी याबाबत प्रतिक्रिया देताना हा जनतेचा संताप असल्याचे स्पष्ट केले.
Comments are closed.