वेधक – खडूवरील कोरीवकाम
दुर्गेश आखाडे
घरात चित्रकलेची कोणतीही पार्श्वभूमी नसताना गुहागर तालुक्यातील पोमेंडी गावचे संदेश विचारे यांनी खडूवर चित्र रेखाटण्याची कला जोपासली आहे. त्यांनी विविध देवदेवता, राष्ट्रपुरूष आणि सामान्य व्यक्तींची चित्रे खडूवर रेखाटली आहेत. संदेश विचारे यांना लहानपणापासून चित्रकलेची आवड होती. कला असली तरी पुढे जाण्यासाठी घरची आर्थिक परिस्थिती आड येत होती, तरीही त्यांनी आपली आवड जोपासली. गुहागर तालुक्यातील शृंगारतळी येथील एका व्यावसायिक चित्रकाराकडे त्यांनी काम करण्यास सुरुवात केली. कोणत्याही प्रकारचे अवघड चित्र भिंतीवर, कापडावर किंवा प्लायवूडवर काढण्याचा चांगला सराव झाल्याने त्यांची चित्रकला अधिक आकर्षक बनत गेली.
काहीतरी वेगळं करण्याची इच्छा संदेश विचारे यांच्या मनात होती. त्यांनी फावल्या वेळेत खडूवर टोकदार सुईच्या सहाय्याने कोरीव काम सुरू केले. सुरुवातीला हे काम अशक्य वाटत होते, पण अथक मेहनतीनंतर संदेश विचारे यांनी खडूवरच्या कोरीव कामात यश मिळवले. सतत आठवडाभर खडूवर कोरीव काम केल्यानंतर आपण अशाप्रकारे खडूवर चित्र रेखाटू शकतो असा आत्मविश्वास संदेश विचारे यांच्या मनात निर्माण झाला. खडूवर रेखाटलेल्या चित्रात रंग भरले तर ते चित्र हुबेहूब दिसेल असे वाटू लागल्याने त्यांनी रंगकाम हाती घेतले. खडूवर जितक्या नाजूक हातांनी चित्र रेखाटले होते तितक्याच बारकाईने रंग भरणे आवश्यक होते. संदेश विचारे यांनी ही कलाही आत्मसात केली. त्यांनी खडूवर गणपती बाप्पा, त्रिमूर्ती दत्त, छत्रपती शिवाजी महाराज, जिजामाता, साईबाबा आणि अष्टविनायक गणेश दर्शन रेखाटले आहे.
खडूवर गणपतीचे चित्र काढल्यानंतर अष्टविनायक खडूवर रेखाटण्याचा संकल्प केला. सुरुवातीला अशक्यप्राय वाटणारे अष्टविनायकाचे चित्र संदेश यांनी खडूवर रेखाटले. पितृप्रेम व्यक्त करताना संदेश यांनी आपल्या वडिलांचे हुबेहूब चित्र खडूवर रेखाटले आहे. संदेश यांनी खडूवर हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी, राष्ट्रपती ए पी जे अब्दुल कलाम, धर्मवीर आनंद दिघे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची चित्रे रेखाटली आहेत. संदेश विचारे उत्तम रांगोळीकारही आहेत.
Comments are closed.