“उद्योगपतींच्या लग्नात वेटर बनतात, पण सहकलाकारासाठी वेळ नाही”, मुश्ताक खान यांच्या अंत्यसंस्काराला बॉलीवूड स्टार्सनी दांडी मारल्याने रझा मुराद संतापले
बॉलीवूडचे ज्येष्ठ आणि अष्टपैलू अभिनेते मुश्ताक खान यांच्या निधनाने चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. मात्र, त्यांच्या अंत्यसंस्काराला बॉलीवूडमधील एकाही बड्या स्टारने हजेरी न लावल्याने आता नव्या वादाला तोंड फुटले आहे. यावरून ज्येष्ठ अभिनेते रझा मुराद यांनी संताप व्यक्त केला असून त्यांनी इन्स्टाग्रामवर व्हिडिओ शेअर करत बॉलीवूड कलाकारांच्या दुटप्पीपणावर सडकून टीका केली आहे.
मुश्ताक खान यांना अंतिम निरोप देण्यासाठी राजपाल यादव, संजय मिश्रा, अन्नू कपूर, रजत बेदी, सुलभा आर्या, मनिष वाधवा, शहजाद खान, झैद दरबार, हास्यकलाकार सुनील पाल आणि दिग्दर्शक अनिस बाझमी यांसारखे मोजकेच सहकलाकार उपस्थित होते. अतिशय दुःखाची आणि खेदाची गोष्ट म्हणजे, ज्यांना आपण ‘स्टार’ म्हणतो, असा एकही मोठा अभिनेता किंवा अभिनेत्री त्यांना शेवटचा निरोप द्यायला आली नाही. त्यांचे अनेक साथीदार, सहकलाकार आले; पण इंडस्ट्रीतील एकही बडा चेहरा तिथे दिसला नाही. ज्या माणसाने आपल्या आयुष्याची 50 वर्षे चित्रपटसृष्टीला दिली, त्याला शेवटचा निरोप देण्यासाठी तुमच्याकडे 50 मिनिटेही नाहीत? असा सवाल रझा मुराद यांनी केला.
एखाद्या उद्योगपतीच्या मुलाचे लग्न असेल, तर हे स्टार्स फक्त हजेरीच लावत नाहीत, तर तिथे वेटरसारखे पाहुण्यांना अन्नही वाढतात. किंवा एखाद्या राजकीय पक्षाचा कार्यक्रम असेल तर हे नक्की हजेरी लावतात. पण आपल्याच एका सहकलाकाराच्या दुःखात सहभागी व्हायला यांच्याकडे वेळ नसतो, अशी टीकाही रझा मुराद यांनी केली.
इन्स्टाग्रामवर ही पोस्ट पहा
मुश्ताक खान यांनी कोणाचीही चापलुसी किंवा लाचारी न करता स्वतःच्या अभिनयाच्या जोरावर हे स्थान मिळवले होते. त्यांना हयातीतही कोणाच्या लाचारीची गरज नव्हती आणि मृत्यूच्या वेळीही नाही. पण ज्या मुश्ताक यांनी जवळपास प्रत्येक मोठ्या स्टारसोबत काम केले, त्यांना शेवटचे पाहायला एकही स्टार आला नाही, याचे शल्य कायम राहील. नाव, प्रसिद्धी आणि पैसा हा नेहमी टिकणारा नाही, तो एक दिवस निघून जाईल, असेही रझा मुराद यांनी सुनावले.
दरम्यान, कर्करोगाची लागण झाल्यानंतर मुश्ताक खान यांच्यावर मुंबईतील नानावटी रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्यांची प्रकृती चिंताजनक बनली आणि 24 सप्टेंबर रोजी त्यांची प्राणज्योत मालवली. शुक्रवारी मुंबईत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
Comments are closed.