दुष्काळग्रस्त भागाची पाहणी करायला केंद्र सरकारचे पथक महाराष्ट्रात येणार, कृषीमंत्र्यांची माहिती

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

महाराष्ट्रातील तब्बल 358 तालुक्यांपैकी 265 तालुक्यांमध्ये दुष्काळी परिस्थिती आहे. राज्यात पावसाचा खंड पडल्यामुळे शेतातील पिके करपून गेली आहेत. पावसाची तूट आणि त्याचा शेतीवर झालेल्या परिणामामुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने महाराष्ट्रातील 36 पैकी 32 जिल्ह्यांतील 265 तालुक्यांत कोरडा दुष्काळ जाहीर केला आहे. दरम्यान आता राज्यातील दुष्काळग्रस्त भागांची पाहणी करायला केंद्र सरकारचे पथक महाराष्ट्रात येणार आहे. केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी ही माहिती दिली. पीटीआयने याबाबत वृत्त दिले आहे. महाराष्ट्र व कर्नाटक या दोन राज्यांमधील दुष्काळी भागाची हे पथक पाहणी करणार आहे.

जुलै महिन्यात सर्वदूर हजेरी लावणाऱ्या पावसाने ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात राज्यात दडी मारली. अशातच देशातून नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी परतीचा प्रवास सुरू केल्याने पावसाच्या पुनरागमनाची शक्यता मावळली होती. पावसाअभावी शेतातील उभी पिके करपल्याने बळीराजाला दिलासा देण्यासाठी राज्यात दुष्काळ जाहीर करण्याची मागणी शिवसेनेसह राज्यातील विरोधी पक्षाकडून सातत्याने करण्यात येत होती. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सलग दोन दिवस दुष्काळी भागाचा दौरा करून परिस्थितीची माहिती घेतली होती. त्यानंतर मदत आणि पुनर्वसन विभागाने दुष्काळ व्यवस्थापन संहिता 2016 नुसार दुष्काळग्रस्त तालुक्यांसाठी उपाययोजना आणि सवलती लागू झाल्या आहेत.

Comments are closed.