अमेरिकेने इराणचा शांततेचा प्रस्ताव फेटाळला; शत्रूला धूळ चारण्यासाठी आम्ही सज्ज, इराणचे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनींचा इशारा
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी होर्मुझची सामुद्रधुनी खुली करण्यासंदर्भातील इराणचा प्रस्ताव नुकताच फेटाळून लावला आहे. यानंतर इराण आणि अमेरिका यांच्यातील तणाव पुन्हा एकदा शिगेला पोहोचला असून, इराणचे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनी यांनी अमेरिकेला कडक इशारा दिला आहे. इराणची सशस्त्र तयारी पूर्ण असून शत्रूंवर नामुष्की ओढवून आणण्यासाठी आम्ही सज्ज आहोत, असे खामेनी यांनी म्हटले आहे.
इराणचा पवित्र संरक्षण सप्ताह आणि हिजबुल्लाचे दिवंगत नेते हसन नसराल्लाह यांच्या पुण्यतिथीनिमित्त दिलेल्या संदेशात खामेनी यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, “सध्या संपूर्ण इराणमध्ये विविध स्तरांवर सशस्त्र तयारी पाहायला मिळत आहे. आमची ही तयारी शत्रूंना लाजवेल आणि इराणला सन्मान मिळवून देईल.”
खामेनी यांनी होर्मुझच्या सामुद्रधुनीचे रक्षण करणाऱ्या इराणी सैनिकांचे कौतुक केले. ते म्हणाले की, इराणी योद्ध्यांनी दिलेल्या वेदनादायी धक्क्यांमुळे शत्रूचे सैन्य आता अरबी समुद्राच्या पुढे येऊ धजावत नाही आणि लवकरच अरबी समुद्रही त्यांच्यापासून मुक्त केला जाईल.
अमेरिकेने का फेटाळला प्रस्ताव?
गेल्या आठवड्यात संयुक्त राष्ट्रांच्या ८१ व्या महासभेत इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अरागची यांनी ७ दिवसांचा एक प्रस्ताव मांडला होता. यामध्ये अमेरिकेने लष्करी दबाव कमी केल्यास इराण होर्मुझची सामुद्रधुनी खुली करेल, असे म्हटले होते. मात्र संयुक्त राष्ट्रांतील अमेरिकेचे राजदूत माईक वॉल्ट्झ यांनी रविवारी सांगितले की, अण्वस्त्र कार्यक्रमावर चर्चा करण्यापूर्वी इराणने निर्बंधांमधून सूट आणि गोठवलेल्या अब्जावधी डॉलर्सच्या निधीची मागणी केली होती, ज्यामुळे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हा प्रस्ताव फेटाळून लावला.
Comments are closed.