‘एआय’चा गैरवापर घातक, बिल गेट्स यांचा इशारा
आर्टिफिशियल इंटेलिजेन्स अर्थात ‘एआय’ हे एवढे शक्तिशाली तंत्रज्ञान आहे की त्यावर लक्ष न ठेवल्यास किंवा मर्यादा न घातल्यास अशा घटना होऊ शकतात ज्यामुळे सुमारे एक अब्ज लोकांचे प्राण जाण्याचा धोका आहे. एआयचा गैरवापर घातक ठरेल असा इशारा मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेट्स यांनी दिला. त्यांनी एआयच्या धोक्यांकडे लक्ष वेधतानाच एआय विकसित करण्यासंदर्भात काही नियम बनवायला हवे, असे आवाहन कायदे मंडळांना केले.
बिल गेट्स यांनी या मुलाखतीतून एआयचे सामर्थ्य आणि संभाव्य धोके जगासमोर मांडले. ते म्हणाले की, एआय हे अतिशय शक्तिशाली टूल आहे. या तंत्रज्ञानामुळे निर्माण होणाऱया संभाव्य धोक्यांचा सामना करण्यासाठी सुरक्षा व्यवस्था आणि देखरेखीकडे लक्ष देणे आवश्यक आहे. त्याबाबत सविस्तर चर्चा करायला हवी. एआयच्या धोक्यांपासून सुरक्षा व्यवस्था कंपन्यांच्या इच्छेवर सोडायला नको, तर त्यासाठी कायदे बनवायला हवेत. हे तंत्रज्ञान एवढे धोकादायक ठरू शकते की, ते स्वतः अशा काही घटना घडवून आणेल आणि त्यातून एक अब्ज लोकांचे प्राण धोक्यात येऊ शकतात. त्यामुळे आताच याबाबत नियम बनवायला हवेत. यामुळे एआय कंपन्यांचे काम थोडे वाढेल. मात्र त्यांच्या प्रगतीचा वेग मंदावणार नाही, असे गेट्स म्हणाले.
‘एआय किल स्विच’ची गरज
परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याचे लक्षात येताच एआय बंद करणारी व्यवस्था असायला हवी. स्वतःहून संगणकावर ताबा मिळवून अशी यंत्रणा बंद करेल, अशा पातळीपर्यंत सध्या एआयचा विकास झालेला नाही. मात्र किल स्विचवर होत असलेल्या चर्चांवरून हे लक्षात येते की, लोकांना या तंत्रज्ञानाच्या गैरवापराची भीती कळून चुकली आहे, असे गेट्स म्हणाले.
Comments are closed.