ब्रिजभूषण सिंह यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

महिला कुस्तीपटूंकडून निर्दोष मुक्ततेला आव्हान : पुढील सुनावणी 9 ऑक्टोबरला

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

महिला कुस्तीपटूंच्या कथित लैंगिक छळाच्या प्रकरणात भारतीय कुस्ती महासंघाचे (डब्ल्यूएफआय) माजी अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांच्या अडचणी पुन्हा एकदा वाढत असल्याचे दिसत आहे. दिल्लीच्या राऊस अॅव्हेन्यू न्यायालयाने (सत्र न्यायालय) चार महिला कुस्तीपटूंनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना बृजभूषण शरण सिंह आणि ‘डब्ल्यूएफआय’चे माजी सचिव विनोद तोमर यांना नोटीस बजावली आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी 9 ऑक्टोबरला होणार आहे.

महिला कुस्तीपटूंनी 3 ऑगस्ट रोजी दोन्ही आरोपींना निर्दोष मुक्त करण्याच्या सत्र न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान दिले होते. राऊस अॅव्हेन्यू न्यायालयाचे विशेष न्यायाधीश दिग्विजय सिंह यांनी सोमवारी चार महिला कुस्तीपटूंच्या याचिकेची दखल घेत सुनावणी केली. दंडाधिकारी न्यायालयाने साक्षीदार आणि पुराव्यांचे योग्य मूल्यांकन न करता किरकोळ चुकांच्या आधारावर खटला रद्द केल्याचा आरोप महिला कुस्तीपटूंनी याचिकेत केला आहे. निर्दोष मुक्ततेचा आदेश कायदेशीररित्या वैध नाही आणि तो कालबाह्य रूढीवादी विचारांवर आधारित असल्याचा युक्तिवादही कुस्तीपटूंनी केला आहे.

महिला कुस्तीपटूंनी केले लैंगिक छळाचे आरोप

बृजभूषण शरण सिंह आणि महिला कुस्तीपटूंमधील हा वाद 2023 मध्ये समोर आला होता. 2016 ते 2022 दरम्यान राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धा, प्रशिक्षण शिबिरे, डब्ल्यूएफआय कार्यालय आणि इतर ठिकाणी बृजभूषण शरण सिंह यांच्याकडून त्यांना अयोग्य वागणूक आणि लैंगिक छळाला सामोरे जावे लागले, असा आरोप अनेक प्रमुख महिला कुस्तीपटूंनी केला आहे. या प्रकरणात डब्ल्यूएफआयचे माजी सचिव विनोद तोमर यांचे नाव सहआरोपी म्हणून देण्यात आले होते.

Comments are closed.