भाजपने चंद्रशेखर आझाद यांना विजयात मदत केली!
बसप अध्यक्ष मायावतींचा दावा : मतपत्रिकेद्वारे व्हावी निवडणूक
वृत्तसंस्था, लखनौ
बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्ष मायावती यांनी सोमवारी ईव्हीएम विरोधात मोर्चा उघडत मतपत्रिकेद्वारे निवडणूक करविण्याची मागणी केली. ईव्हीएममध्ये फेरफार करतच भाजने चंद्रशेखर आझाद यांना नगीना मतदारसंघात विजयी करविले आहे. बसपला नुकसान पोहोचविण्यासाठी चंद्रशेखर आझाद यांना खासदार करण्यात आल्याचा आरोप मायावती यांनी केला.
बसपने प्रारंभापासून ईव्हीएमविरोधात भूमिका घेतली आहे. बसपनेच ईव्हीएमला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. सर्वोच्च न्यायालयाने ईव्हीएम संपुष्टात आणण्याऐवजी व्हीव्हीपॅट लावण्याचा निर्देश दिला होता. परंतु व्हीव्हीपॅटचाही फायदा झाला नाही. व्हीव्हीपॅटच्या पूर्ण स्लीपची गणना होत नाही. कुठल्याही यंत्राला रिमोटने हॅक केले जाऊ शकते. अशास्थितीत कुठल्याही मतदाराला तयचे मत योग्य ठिकाणी पडल्याचा विश्वास दिला जाऊ शकत नसल्याचा दावा मायावतींनी केला.
चंद्रशेखर यांना जनाधार नाही
नगीना मतदारसंघात चंद्रशेखर यांना कुठलाच जनाधार नाही. भाजपने षडयंत्राच्या अंतर्गत त्यांना विजयी करविले आहे. बसपला नुकसान पोहोचविण्याच्या उद्देशाने हे करण्यात आले आहे. भाजपच्या इशाऱ्यावरच चंद्रशेखर देशभरात दलितांवरून निदर्शने करत असल्याचा आरोप मायावती यांनी केला.
दिशाभूलला बळी पडू नका
जेथे जेथे दलितांवर अत्याचार होतो, तेथे चंद्रशेखर पोहोचतात, परंतु पीडितांना न्याय मिळवून देण्यासाठी अधिकाऱ्यांसोबत चर्चा करण्याऐवजी ते युवांना रस्त्यांवर उतरवितात. पोलीस युवांच्या विरोधात गुन्हे नोंदवून त्यांना तुरुंगात टाकतात. यामुळे भविष्यात हे युवा नोकरीसाठी देखील पात्र ठरत नाहीत. गुन्हे संपुष्टात येईपर्यंत सरकारी नोकरी मिळू शकत नाही. अशास्थितीत चंद्रशेखर यांच्यापासून युवांनी सावध राहण्याची गरज आहे. खासकरून दलितांनी त्यांच्यापासून दूर रहावे असा सल्ला मायावतींनी दिला आहे.
गोंधळ दूर करा
एसआयआरवरून अनेक प्रकारचे गोंधळ निर्माण करण्यात आले आहेत. हे गोंधळ वेळीच दूर करण्यात यावेत. अशाच प्रकारे अन्य प्रकरणांना हाताळण्यात यावे. देशात निष्पक्ष निवडणूक व्हावी हीच बसपची मागणी आहे, यामुळे ईव्हीएमचा वापर रोखून मतपत्रिकेद्वारे मतदान करविले जावे, असे मायावती म्हणाल्या.
Comments are closed.