बँक कर्मचाऱ्यांचा संप असल्याने बँकिंग कामकाज सुरळीत सुरू आहे

मागण्यांचा विचार करण्यासाठी उच्चस्तरीय समिती स्थापन

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

सोमवार, 28 सप्टेंबरपासून सुरू होणारा तीन दिवसीय देशव्यापी बँक कर्मचारी संप तूर्तास स्थगित केल्याने बँकांमधील दैनंदिन व्यवहार सुरळीत पार पडताना दिसून आले. रविवारी रात्री इंडियन बँक्स असोसिएशन (आयबीए) आणि युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स (यूएफबीयू) यांच्यात झालेल्या बैठकीत विविध प्रलंबित मुद्यांवर चर्चा झाल्यानंतर आंदोलन आणि तीन दिवशीय संपाचा निर्णय स्थगित करण्यावर एकमत झाले.

रविवारी रात्री आयबीए आणि यूएफबीयूच्या प्रतिनिधींमध्ये बैठक झाली. बैठकीतील सविस्तर चर्चेनंतर पुढील संवाद आणि निराकरण सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. विविध मागण्यांवर विचार करण्यासाठी आयबीए आणि युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सची एक उच्चस्तरीय समिती तात्काळ स्थापन केली जाणार आहे. ही समिती पाच दिवसांच्या बँकिंग आठवड्याशी संबंधित सर्व संभाव्य पर्यायांवर विचार करेल. याव्यतिरिक्त कर्मचारी, इतर हितधारक आणि बँकेच्या ग्राहकांना मान्य होईल असा तोडगा काढण्यासाठी विविध हितधारकांशी चर्चा केली जाईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

यूएफबीयूने 28 सप्टेंबरपासून तीन दिवसांच्या देशव्यापी बँक संपाची हाक दिली होती. पाच दिवसांचा बँकिंग आठवडा, निवृत्तीवेतनाशी संबंधित मुद्दे आणि कर्मचाऱ्यांच्या कल्याणाच्या इतर मागण्यांसाठी हा संप प्रस्तावित होता. या संपामुळे बँकिंग कामकाजावर परिणाम होण्याची शक्यता होती. या पार्श्वभूमीवर, बँकांनी ग्राहकांना प्रथम अत्यावश्यक व्यवहार पूर्ण करण्याचा आणि डिजिटल बँकिंग सेवांचा जास्तीत जास्त वापर करण्याचा सल्ला दिला होता. मात्र, संप टळल्याने अनेक ग्राहक आणि कंपन्यांना मोठा दिलासा मिळाला.

Comments are closed.