Asian Games 2026 मधील गोल्डन गर्ल्सची कौतुकास्पद कामगिरी, 10 पैकी 8 पदके महिलांच्या नावावर
नवी दिल्ली : जपान येथील आयची-नागोया येथे सुरु असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा 2026 मध्ये (Asian Games 2026) भारताने विविध क्रीडा प्रकारांमध्ये दमदार कामगिरी करत सुवर्णपदके पटकावली आहेत. या स्पर्धेत बुधवारपर्यंत (30 सप्टेंबर) 10 सुवर्णपदके पटकावली, ज्यातील 8 सुवर्णपदकांमध्ये महिला खेळाडूंचे मोठे योगदान होते. विशेष म्हणजे महिला खेळाडू नीरू धांडा आणि चिखिता थानिप्रथी यांनी सर्वाधिक प्रत्येकी दोन सुवर्णपदके देशाला मिळवून दिले. क्रिकेट, कबड्डी, नेमबाजी, अॅथलेटिक्स तसेच तिरंदाजी या खेळांमध्ये पदके मिळवली आहेत.
चिखिता थानिप्रथीने यंदाच्या आशियाई स्पर्धेत दोन सुवर्णपदके पटकावली आहेत. बुधवारी (30 सप्टेंबर) तिने प्रितिका प्रदीप आणि ज्योती सुरेखा वेण्णम यांच्यासोबत महिला कंपाऊंड सांघिक प्रकारात (Women’s Compound Team Gold) सुवर्णपदक पटकावले. तसेच, साहिल जाधवसोबत तिने मिश्र कंपाऊंड सांघिक (Compound Mixed Team Gold) प्रकारात सुवर्णपदक पटकावले.
नीरू धांडाने फक्त दोन सुवर्णपदकच नव्हे तर एका रौप्य पदकाची कमाई करून इतिहास रचला आहे. नीरू धांडाने महिलांच्या वैयक्तिक ट्रॅप शूटिंग सुवर्णपदक पटकावले. तर, तिने कायनन चेनाईच्या साथीने ट्रॅप मिक्स टीम (Trap Mixed Team) प्रकारात भारताला आणखी एक सुवर्णपदक मिळवून दिले. तसेच, तिने आशिमा अहलावत आणि मनिषा कीर यांच्यासोबत मिळून महिला ट्रॅप सांघिक (Women’s Trap Team) प्रकारात भारताला रौप्यपदक मिळवून दिले.
सुरुची सिंग आणि कमलजीत या जोडीने 10 मीटर एअर पिस्तूल मिश्र सांघिक (10m Air Pistol Mixed Team) नेमबाजी प्रकारात सुवर्णपदक जिंकून इतिहास रचला. या दोघांनीही अंतिम फेरीत 484.6 गुणांची कमाई करत एक नवा आशियाई विक्रम प्रस्थापित केला.
भारतीय महिला 4*400 मीटर रिले संघाने सुवर्णपदक पटकावले. किरण पाहल, पूवम्मा मचेत्तिरा, प्राची चौधरी आणि विथ्या रामराज यांच्या चौकडीने 3.29.69 मिनिटे अशी सर्वोत्तम वेळ नोंदवत सुवर्णपदकाला गवसणी घातली. याच विजयासोबत, ॲथलेटिक्समधील या स्पर्धेतील भारताचे हे पहिलेच सुवर्णपदक ठरले होते. तसेच, भारताने या प्रकारात आपला 44 वर्षांचा पदकांचा सलग विक्रम कायम राखला.
भारतीय महिला कबड्डी संघाने अंतिम सामन्यात इराणचा 37 – 34 असा पराभव करत सुवर्णपदक पटकावले. या विजयासोबतच, भारतीय महिला कबड्डी संघाने गतविजेतेपद राखण्यात यश मिळवले आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेच्या इतिहासातील भारतीय महिलांचे हे एकूण चौथे सुवर्णपदक आहे. याआधी 2010, 2014 आणि 2022 मध्ये सुवर्णपदक पटकावले होते.
हरमनप्रीत कौर नेतृत्वात भारतीय महिला क्रिकेट संघाने अंतिम सामन्यात श्रीलंकेविरोधात 147 धावांनी दणदणीत विजय मिळवत सुवर्णपदकावर नाव कोरले होते. या विजयासोबतच भारताचे यंदाच्या स्पर्धेतील हे पहिले सुवर्णपदक ठरले होते. तर, आशियाई क्रीडा स्पर्धेत आपले वर्चस्व राखत सलग दुसऱ्यांदा सुवर्णपदक आपल्या नावावर केले.
Comments are closed.