धक्कादायक! उडत्या विमानात दोन पायलट भिडले!! दुबईहून तेल अवीवला जाणाऱ्या विमानात प्रवाशांच्या किंकाळ्या आणि आरडाओरड
दुबईहून तेल अवीवला जाणाऱ्या ‘फ्लाय दुबई’ कंपनीच्या विमानात एक धक्कादायक आणि प्रवाशांचा जीव धोक्यात घालणारी घटना बुधवारी घडली. विमान आकाशात उडत असताना दोन पायलटमध्ये क्षुल्लक कारणावरून भांडण झाल्यानंतर एका पायलटने आपल्या सहकारी पायलटवर चाकूने हल्ला केला. या दोघांच्या भांडणामुळे हे विमान अवघ्या एका मिनिटात 17 हजार फूट खाली आले. यामुळे विमानातील 174 प्रवाशांचा जीव धोक्यात घालण्यात आला. सुरुवातीला या विमानाचे अपहरण करण्यात आल्याचे सांगितले जात होते. परंतु हे अपहरण नसून हा वाद दोन पायलटमधील होता, हे स्पष्ट झाल्यानंतर या विमानाचे सौदी अरबमध्ये इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले.
दुबईहून तेल अवीवला जाणाऱ्या विमानात ही घटना आज सकाळी 9 वाजेच्या सुमारास घडली. या विमानात 27 मुलांसह एकूण 174 प्रवाशी होते. विमानाच्या काॅकपीटमध्ये पायलट आणि सहपायलट यांच्यात भांडण झाले होते. या दोन्ही पायलटमध्ये जोरदार वाद झाल्यानंतर हाणामारी झाली. एका पायलटने चाकूने हल्ला केल्यानंतर दुसऱ्या पायलटने विमानाचा ताबा घेण्याचा प्रयत्न केला. दुसऱ्या पायलटने आणि काही प्रवाशांनी त्याला रोखले. एका वैमानिकाने विमान जमिनीच्या दिशेने वळवून ते क्रॅश करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा हा वाद सुरू झाला असेही एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले. फ्लाईट रडारनुसार, विमान अवघ्या दोन मिनिटांत 34 हजार फुटांवरून 16,600 फूट उंचीवर आले. विमान खाली येऊ लागले तेव्हा पुढे बसलेले काही इस्रायली प्रवाशी काॅकपीटच्या दिशेने धावले. त्यांनी हल्लेखोर वैमानिकाशी झटापट करून त्याला काॅकपीटमधून बाहेर काढले. याचदरम्यान विमानातून आपत्कालीन सिग्नल पाठवण्यात आले. मात्र दोघांमधील भांडण नेमक्या कोणत्या कारणावरून झाले, याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.
इमर्जन्सी कोडने उडवला गोंधळ
विमानातून सुरुवातीला ‘7700’ हा आंतरराष्ट्रीय इमर्जन्सीचा कोड पाठवण्यात आला होता. त्यानंतर लगेच विमान हायजॅक झाल्याचा किंवा हस्तक्षेपाचा इशारा देणारा ‘7500’ हा कोड पाठवला गेला. हा संदेश आल्यानंतर इस्रायलकडे जाणारे हे विमान सौदी अरेबियाच्या दिशेने मागे फिरले. एकापाठोपाठ दोन इमर्जन्सी कोड आल्याने हा सर्व गोंधळ उडाला. अखेर हे विमान हायजॅक झाले नसल्याने सर्वांनी सुटकेचा निःश्वास सोडला.
हायजॅक नसल्याचे स्पष्टीकरण
विमान हायजॅक झाल्याची कोणतीही निश्चित माहिती नव्हती. परंतु पायलटशी संपर्क होत नसल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले होते, असे एका इस्रायली सुरक्षा अधिकाऱ्याने म्हटले. त्यामुळे विमानाचा मार्ग बदलून ते सौदी अरबमध्ये उतरवण्यात आले. या घटनेमुळे इस्रायलने तत्काळ आपली लढाऊ विमाने आकाशात तैनात केली.
Comments are closed.