दुष्काळ दौऱ्यात गैरहजर, केजच्या तहसीलदारचा पदभार काढला; जिल्हाधिकाऱ्यांची धडक कारवाई, नायब तहसीलदारांकडे अतिरिक्त पदभार
केज तालुक्यात दुष्काळी परिस्थिती गंभीर असतानाही आढावा बैठकीला गैरहजर राहणारे तहसीलदार भरत गंगावणे यांना जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी चांगलाच दणका दिला. गंगावणे यांचा पदभार काढून तो नायब तहसीलदार अशोक भंडारे यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.
बीड जिल्हयात दोन महिन्यांपासून पावसाने ओढ दिल्यामुळे भयंकर दुष्काळ वणवा पेटला आहे. राज्य सरकारने दुष्काळ जाहीर केला असून, महसूल यंत्रणेला उपाययोजनांच्या अंमलबजावणीसाठी सज्ज राहण्याचे आदेश दिले आहेत. पिण्याचे पाणी, चारा छावण्यांना प्राधान्य देण्याची सक्त सूचना सरकारने केली आहे. याच अनुषंगाने आमदार नमिता मुंदडा यांच्या उपस्थितीत तालुक्यातील दुष्काळाचा आढावा घेण्यासाठी बैठक बोलावण्यात आली होती. मात्र तहसीलदार भरत गंगावणे यांनी चक्क बैठकीला दांडी मारली.
परिस्थितीचे कोणतेही गांभीर्य नसलेल्या तहसीलदारांच्या विरोधात २४ सप्टेंबर रोजी आमदार नमिता मुंदडा यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली. लोकप्रतिनिधींच्याच नव्हे तर खुद्द जिल्हाधिकारी विवेक जॉ न्सन यांनी २६ सप्टेंबर, रोजी दुष्काळ पाहणीसाठी तसेच आढावा घेण्यासाठी तहसीलदार कार्यालयाला भेट दिली होती. त्यावेळीही भरत गंगावणे हे गैरहजर होते.
तालुकास्तरावरील दुष्काळ निवारण उपाययोजनांचा समन्वय आणि अंमलबजावणीची जबाबदारी तहसीलदारांची आहे. मात्र कर्तव्यात कसूर केल्याच्या कारणावरून भरत गंगावणे यांच्याकडून तहसीलदारपदाचा पदभार काढून घेण्याचा निर्णय जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी घेतला. गंगावणे यांचा पदभार सध्या नायब तहसीलदार अशोक भंडारे यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.
Comments are closed.