भारत आणि UAE दरम्यान तेल पाइपलाइनची तयारी
होर्मुझ संकटादरम्यान पर्यायाचा शोध : ओमान-युएईमधून थेट होणार तेल-गॅसचा पुरवठा
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
होर्मुझ संकटादरम्यान भारत ऊर्जा पुरवठा सुरक्षित ठेवण्यासाठी नव्या रणनीतिवर काम करत आहे. याच्या अंतर्गत भारत आणि युएईदरम्यान समुद्राखाली तेल आणि गॅस पाइपलाइन टाकण्याची तयारी आहे. केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांनी युएईचे विदेश व्यापारमंत्री थानी बिन अहमद अल जेउदी यांच्यासोबतच्या चर्चेनंतर याची पुष्टी दिली आहे. सरकारने ओमान-युएईमधून भारतापर्यंत खोल सागरात पाइपलाइन प्रकल्पाला प्राथमिकतेत ठेवले आहे. एमईआयडीपी (मीडिल इर्स्ट टू इंडिया डीप-वॉटर पाइपलाइन) अंतर्गत पाइपलाइन ओमान आणि युएईच्या किनाऱ्यावरून सुरू होत अरबी समुद्राखालून गुजरात आणि महाराष्ट्राच्या किनाऱ्यापर्यंत पोहोचू शकते. हा भारत सरकारचा अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्प ठरण्याची शक्यता असून यात जागतिक स्तरावरील कंपन्यांची मदत घेतली जाऊ शकते.
पूर्वी केवळ गॅस पाइपलाइनची योजना
जून महिन्यात केंद्र सरकारने हा खासगी प्रकल्प असल्याचे म्हटले होते. प्रारंभी यात केवळ गॅस पाइपलाइनची योजना होती, परंतु आता समुद्रमार्गे कच्चे तेल आणण्याच्या शक्यतेवरही तांत्रिक अध्ययन सुरू झाले आहे. पेट्रोलियम मंत्रालयाच्या निर्देशावर सरकारी कंपन्या प्रकल्पाचा विस्तृत अहवाल तयार करत आहेत. यात खोल समुद्रात पाइपलाइन टाकण्याचे तंत्रज्ञान, खर्च आणि सुरक्षा समवेत इतर पैलूंची पडताळणी करण्यात येणार आहे.
पाइपलाइनची आवश्यकता
भारत स्वत:च्या आवश्यकतेच्या सुमारे 88 टक्के कच्चे तेल आयात करतो. होर्मुझ सामुद्रधुनीत तणावादरम्यान भारत ऊर्जा पुरवठ्यासाठी पर्यायी मार्ग तयार करू इच्छितो. देशात येणारा निम्म्याहून अधिक एलपीजी आणि एलएनजी देखील कतार आणि युईमधून याच सागरी मार्गाने जहाजांच्या माध्यमांद्वारे प्राप्त होत असतो.
थेट पुरवठ्यामुळे खर्च घटणार
ओमान, युएई, कतार आणि सौदी अरेबियाच्या गॅस अन् तेल साठ्यामधून तेल पुरवठा मिळाल्यावर सागरी जहाजांवरील निर्भरता कमी होऊ शकते. यामुळे तेल आणि गॅसची वाहतूक आणि विम्यावरील खर्च घटू शकतो. आंतरराष्ट्रीय बाजारात तेल अन् गॅसच्या किमती अचानक वाढल्यावर भारतावर पडणारा दबावही कमी होऊ शकतो.
3 किमी पाइपलाइनचे परीक्षण
प्रकल्प विकसित करणारी संस्था साउथ एशिया गॅस एंटरप्राइजने सुमारे 25 कोटी रुपयांचा खर्च करत जवळपास 3 किलोमीटर लांब पाइपलाइन टाकून परीक्षण केले आहे. सर्व अटी पूर्ण झाल्यावर पूर्ण प्रकल्पाच्या उभारणीत सुमारे 5-7 वर्षांचा कालावधी लागण्याचा अनुमान आहे.
सर्वात मोठे आव्हान
या प्रकल्पात सर्वात मोठे इंजिनियरिंग आव्हान समुद्रात सुमारे 3450 मीटरच्या खोलीपर्यंत पाइपलाइन टाकणे आहे. इतक्या खोलवर पाण्याचा दबाव अत्यंत अधिक असतो. पाइपलाइनला सुरक्षित ठेवणे, समुद्रतळावरील खडक आणि दऱ्यांदरम्यान मार्ग तयार करणे आणि भविष्यात त्याची दुरुस्ती करणे देखील मोठे तांत्रिक आव्हान ठरणार आहे.
Comments are closed.