वाढवणवासियांचा सविनय कायदेभंग, गांधी जयंतीदिनी वाढवण येथे सत्याग्रहाची पुनरावृत्ती; ग्रामस्थांनी उचलले बंदरासाठी टाकलेले दगड

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली झालेल्या मिठाच्या सत्याग्रह आणि दांडी यात्रेचा आदर्श घेत, वाढवण बंदराविरोधातील आंदोलनाला आज गांधी जयंतीच्या दिवशी सत्याग्रहाचे स्वरूप देण्यात आले.पालघर जिल्ह्यातील ग्रामस्थ, मच्छीमार, आदिवासी, शेतकरी आणि महिलांनी मोठ्या संख्येने ‘वाढवण यात्रा’ काढत बंदर उभारणीसाठी टाकण्यात आलेले दगड प्रतिकात्मकरीत्या उचलून बाजूला केले. प्रशासनाने लादलेल्या निर्बंधांना सविनय कायदेभंगाच्या माध्यमातून आव्हान देत ग्रामस्थांनी आपला विरोध नोंदवला.

या सत्याग्रहामुळे वाढवण बंदरविरोधी आंदोलनाला जिल्ह्यात नव्या जोमाची आणि ऊर्जेची सुरुवात झाली आहे. बंदर उभारणीसाठी ज्या-ज्यावेळी दगड टाकण्यात येतील, त्या-त्या वेळी ते दगड उचलून बाजूला सारण्याचा निर्धार ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे. “ही केवळ दगड उचलण्याची कृती नाही, तर आमच्या समुद्रावर, जमिनीवर आणि उपजीविकेवर होणाऱ्या अतिक्रमणाविरोधातील सत्याग्रह आहे.” असा स्पष्ट संदेश आजच्या आंदोलनातून प्रशासनाला देण्यात आला.

गांधी जयंतीच्या दिवशीच जिल्हा प्रशासनाने लादलेल्या निर्बंधांचा सविनय कायदेभंग करून शांततामय मार्गाने आंदोलन करण्यात आले. वाढवण बंदराच्या नावाखाली स्थानिकांच्या हक्कांवर गदा आणण्याचा कोणताही प्रयत्न स्वीकारला जाणार नाही, असा इशाराही ग्रामस्थांनी दिला.

Comments are closed.