'स्मित-शौर्य'चे कौतुक!
प्रकृतीत सुधारणा : पंतप्रधान मोदी यांनी साधला संवाद
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
तीन दिवसांपूर्वी ‘फ्लाय दुबई’ विमानात दहशतवादी हल्ला करण्याचे कारस्थान स्वत:चे धैर्य आणि प्रसंगावधान यांच्यातून हाणून पाडणारे भारताचे वैमानिक स्मित मच्छार यांच्याशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रत्यक्ष संवाद साधला आहे. कॅप्टन मच्छार यांच्याशी दूरध्वनीवरून बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे साहस आणि समयसूचकता यांचे तोंड भरून कौतुक केले. गुरुवारीही त्यांनी मच्छार यांचा उल्लेख ‘महानायक’ असा केला होता. मच्छार यांनीही यांचे या अभूतपूर्व प्रसंगातील अनुभवांसंबंधी त्यांच्याशी मनमोकळा संवाद करत सविस्तरपणे नेमके काय घडले, हे स्पष्ट केले, अशी माहिती केंद्र सरकारकडून देण्यात आली आहे.
हा प्रसंग खरोखरच अत्यंत आणीबाणीचा होता. मला माझ्या सहवैमानिकाने चाकूने भोसकले होते. मी रक्तबंबाळ परिस्थितीत होतो. मात्र, विमानातील प्रवाशांचे प्राण कोणत्याही परिस्थितीत जाऊ द्यायचे नाहीत, असा निर्धार मी केला होता. त्यामुळे असह्या वेदना होत असतानाही मी विमानावर नियंत्रण ठेवत कॉकपिटचा दरवाजा उघडला. त्यामुळे अन्य प्रवाशांनी त्वरित आत येऊन एक भीषण प्रसंग घडण्यापासून टाळला, अशा शब्दांमध्ये त्यांनी हा प्रसंग या संवादात कथन केला.
हनुमान चालिसाचे पठण
भोसकण्यात आल्यानंतर मी हनुमान चालिसाचे पठण करण्यास प्रारंभ केला. त्यामुळे माझे धैर्य टिकून राहिले. महाबली हनुमान भगवानानेच या प्रसंगातून सर्वांची सुटका केली, असा माझा विश्वास आहे. अत्यंत भयानक संभाव्य प्रसंगातून सर्वांची सुटका होणे ही अविस्मरणीय घटना आहे. मी माझे कर्तव्य पार पाडले, याचा मला सवार्थाने आनंद आहे, अशा शब्दांमध्ये त्यांनी भावना व्यक्त केल्या.
इस्रायल कधीही नाही विसरणार
फ्लायदुबई विमानाचे वैमानिक कॅप्टन स्मित मच्छार यांना इस्रायल कधीही विसरणार नाही. त्यांनी, असामान्य धैर्य, सावधता, प्रसंगावधान आणि निर्धार यांचा परिचय देत 180 विमानप्रवाशांचे प्राण वाचविले आहेत. इस्रायलचे नेते बेंजामिन नेतान्याहू, इस्रायलचे अध्यक्ष आणि इस्रायली संसदेचे अध्यक्ष तसेच इस्रायलची जनता कॅप्टन स्मित मच्छार यांच्यासंबंधी शतश: कृतज्ञ आहे, अशी प्रतिक्रिया इस्रायलचे भारतातील राजदूत रेयुव्हेन अझार यांनी शुक्रवारी व्यक्त केली आहे.
इस्रायल करणार सन्मान
कॅप्टन स्मित मच्छार यांनी हा प्रसंग निभावून नेताना जे अतुलनीय साहस दाखविले आहे, त्यामुळे ते इस्रायली जनतेचे नायक बनले आहेत. इस्रायलचे प्रशासन लवकरच त्यांचा यासाठी सन्मान करणार आहे. त्यांनी सर्वांसमोर एक मोठा आदर्श निर्माण केला आहे, असेही अझार यांनी त्यांच्या निवेदनात स्पष्ट केले.
क्षणभर मी उद्ध्वस्त झाले…
कॅप्टन स्मित मच्छार यांच्या पत्नी सोनल यांची प्रतिक्रियाही आता समोर आली आहे. विमानाच्या कॉकपिटमध्ये त्यांच्यावर हल्ला झाला, हे वृत्त समजल्यानंतर मला क्षणभर उद्ध्वस्तच झाल्यासारखे वाटले. माझी अवस्था पूर्णत: भांबावल्यासारखी झाली होती. तथापि, त्यांची या जीवघेण्यास प्रसंगातून मुक्तता झाली आहे आणि ते जखमी असले तरी सुस्थितीत आहेत, हे समजल्यानंतर माझ्या जीवात जीव आला. या अत्यंत कठीण कालावधीत मला माझे कुटुंबीय, आप्तस्वकीय आणि मित्रमैत्रिणी यांनी धीर दिला आणि माझा विश्वास टिकवून धरण्यासाठी प्रयत्न केले, यासाठी मी त्यांची आभारी आहे, अशा भावना त्यांनी त्यांच्या प्रतिक्रियेत व्यक्त केल्या आहेत. स्मित मच्छार यांची आता पत्नीशी प्रत्यक्ष भेट झाली असून त्यांच्यावर योग्य त्या पद्धतीने उपचार केले जात आहेत. त्यांची प्रकृती आता वेगाने सुधारत आहे. त्यांचा आणि माझा संवाद झाल्याने मला आणखी विश्वास वाटू लागला आहे, अशीही माहिती सोनल मच्छार यांनी एका वृत्तसंस्थेशी संवाद साधताना दिली आहे.
दहशतवादी हल्ल्याचीच शक्यता
दुबईहून इस्रायलला जाणाऱ्या विमानात बुधवारी जो थराकर प्रसंग घडला, तो दहशतवादी हल्लाच होता काय, यासंबंधी स्पष्ट माहिती अद्यापही देण्यात आलेली नाही. तथापि, हे दहशतवादी हल्ल्याचेच कारस्थान होते, हे आत्तापर्यंतच्या तपासातून प्रथमदर्शनी निष्पन्न झाले असून त्या दृष्टीने तपास कार्य करण्यात येत आहे. मात्र, अद्यापही कॅप्टन स्मित मच्छार यांच्यावर हल्ला करणाऱ्या ओमानी सहवैमानिकाचे नाव उघड करण्यात आलेले नाही. त्याची सखोल चौकशी करण्यात येत आहे. तो इस्लामी कट्टरतावादी आहे, हे समजून आलेले आहे. हे आंतरराष्ट्रीय कारस्थान आहे काय, याचा शोध घेतला जात असल्याचे प्रतिपादन केले गेले आहे.
इस्रालय करणार सन्मान
ड कॅप्टन स्मित मच्छार यांचा यथोचित सन्मान करण्याचा इस्रायलचा निर्णय
ड पंतप्रधान मोदी यांच्याशी बोलताना मच्छार यांनी सविस्तर कथन केला प्रसंग
ड ओमानी सहवैमानिकाची सखोल चौकशी, दहशतवादी प्रकाराचा दाट संशय
ड भारताकडूनही या प्रसंगाची गंभीर नोंद, पुढच्या धोरणे लवकरच स्पष्ट होणार
Comments are closed.