‘शिवशाही’ कल्याण, अंबरनाथला 20 हजार घरे उभारणार; पंतप्रधान आवास योजनेतील घरांसाठी राज्य सरकारकडून 46 हेक्टर जमीन घेणार
मुंबई महानगर प्रदेशात सर्वसामान्यांचे हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी शिवशाही पुनर्वसन प्रकल्प कल्याण आणि अंबरनाथ तालुक्यात प्रधानमंत्री आवास योजना 2.0 अंतर्गत (पीएमएवाय) तब्बल 20 हजार घरे उभारणार आहे. त्यासाठी राज्य सरकारकडून नाममात्र किंमतीला कल्याणमध्ये सुमारे 46 हेक्टर जमीन घेतली जाणार आहे.
राज्य शासनाच्या शिवशाही पुनर्वसन प्रकल्प या पंपनीमार्फत पीएमएवाय अंतर्गत सदरची घरे उभारली जाणार आहेत. कल्याण येथे 15 हजार घरांसाठी सुमारे 34 हेक्टर तर अंबरनाथ येथे 5 हजार घरांसाठी 12 हेक्टर जागेची आवश्यकता आहे. सदरची जमीन राज्य सरकार जिल्हाधिकाऱयांच्या माध्यमातून उपलब्ध करून देणार असून त्याची प्रतिएकर केवळ 1 रुपये एवढी नाममात्र किंमत आकारली जाणार आहे. त्यानुसार जमीन अधिग्रहणाचा प्रस्ताव संबंधित जिल्हाधिकाऱयांना दिला जाणार आहे. घरांच्या उभारणीबाबतचा सविस्तर प्रकल्प आराखडा शिवशाहीने तयार केला असल्याची माहिती एका वरिष्ठ अधिकाऱयाने दिली. त्यामुळे घराच्या प्रतीक्षेत असलेल्या सर्वसामान्यांना घर मिळू शकणार आहे.
क्लस्टरलाही वेग
याशिवाय शिवशाहीमार्फत कल्याण–डोंबिवलीतील ७५० हेक्टर आणि उल्हासनगरमधील ३२५ हेक्टर जागेवर समूह पुनर्विकास प्रकल्प राबविण्यात येणार आहे. यात कल्याण–डोंबिवलीतील 6 आणि उल्हासनगर महापालिका क्षेत्रातील 29 प्रकल्प पूर्ण करण्यात येणार आहेत. याबाबत शिवशाहीने संबंधित महापालिका आयुक्तांसोबत सामंजस्य करार केला असून हा प्रस्ताव मंजुरीसाठी राज्य शासनाकडे पाठविला आहे.
Comments are closed.